Saturday, 29 April 2017

अामुचीये कुळी पंढरीचा नेम ः संत भानुदास

जपता नाम विठ्ठलाचे, भय नाही हो काळाचे !
नाममंत्र त्रिअक्षर, करी सदा तो उच्चार!
विठ्ठलनामे सुख, आनंद भानुदासा परमानंद !

महाराष्ट्रातील पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन आपण घेतो त्याचे सर्व श्रेय जाते ते नाथांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांना.
भानुदास महाराज यांचा जन्म इ.स. १४४८ साली एका ब्राह्मण कुळामध्ये झाला. बालपणीच सूर्यनारायणाची उपासना करून त्यांनी त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले होते. प्रपंच चालविण्यासाठी त्यांनी कपड्याचा व्यापार सुरू केला. व्यापाराच्या व्यापात असूनही त्यांनी पंढरीची वारी कधीही चुकविली नाही. भानुदास हे विठ्ठल भक्त होते. त्यांची कीर्ती पसरली ते एका ऐतिहासिक घटनेमुळे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीस आला. श्रीविठ्ठलास आपल्या राज्यात नेवून प्रतिष्ठित करावे, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तसे केले. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्रीविठ्ठल दर्शनार्थ जमू लागले. परंतु, ज्याच्या दर्शनासाठी आपण येथवर आलो आहोत तोच जागेवर नसल्याचे पाहून वारकरी आलाप करू लागले. त्यावेळी भानुदासांनी सर्वांना आश्‍वासन दिले की, मी विठ्ठलास परत येथे आणीन. काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले.
विठ्ठलाने आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्‍नांचा हार भानुदासांच्या गळ्यात घालला असे बोलले जाते. भानुदास तेथून बाहेर पडले. पहाटे काकड आरतीच्यावेळी जेव्हा पुजारी तेथे आले असता त्यांच्या लक्षात आले की, देवाच्या गळ्यात नवरत्‍नांचा हार नाही. राजापर्यंत बातमी पोचली. जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढविण्याचे फर्मान राजाने सोडले. सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास संध्या करीत असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्‍नांचा हार दिसला. हाच चोर असावा असं गृहीत धरून सैनिकाने भानुदासांस बंदी बनविले. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदासांच्या मुखातून अभंग प्रकटला, जै आकाश वर पडो पाहे! ब्रह्मगोळ भंगा जाये ! वडवानळं त्रिभूवन खाये ! तरी तुझीच वाट पाहे गां विठोबा ! ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार त्या सुळास पालवी फुटली. ही बातमी राजापर्यंत पोचली. राजाचा थरकांप उडाला, ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवद्‍भक्‍त असावा हे त्याच्या लक्षात आले. माझ्या भक्‍ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही, असा इशारा विठ्ठलाने दिला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्रीविठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी इ.स. १५०६ चा. (आजही कार्तिकी एकादशीस रथोत्सव होतो तो या दिवसाचे स्मरण म्हणून.) भानुदासांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली.
श्रीविठ्ठल दर्शनास जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हातास दरवाज्याजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत, ती म्हणजे श्रीभानुदास महाराजांची समाधी होय. आजही त्यांच्या समाधीदिनाचा उत्सव वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यात येतो. या दिवशी त्यांच्या वंशजांकडून परंपरेने प्रतिवर्षी समाधीचे पूजन, नैवेद्य कीर्तनादी करण्यात येते.
संत श्री भानुदासांच्या भक्‍तितून अंशत:उतराई होण्यासाठी विठ्ठलाने त्यांच्या वंशात जन्म घेतला तो संत एकनाथ महाराजांच्या रुपात.
भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार,
क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर !

प्रांताप्रांताच्या सीमा ओलांडणारा संत : सेना महाराज

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि!!
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनीं, पाहिली शोधोनि अवघी तीर्थे!!
ऐसा नामघोष पताकांचे भार, ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें!!


श्रीविठ्ठल आणि वारकरी सांप्रदायाने फक्त जातीपातींच्या सीमा मोडल्या नाहीत तर प्रांताप्रांताच्याही सीमा ओलांडल्या. संत सेना महाराज त्याचेच एक उदाहरण. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले.
तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते.
सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजाकडे नाभिकाचे काम करीत असत. आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती. वडील देविदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच भक्तीमार्गाकडे ओढा होता. त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते भक्तीरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्र्रातील त्या काळच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतूर झाले. तिर्थयात्रा करित करीत ते इकडे आले संत निवृत्तीवरनाथ, संत ज्ञानेश्र्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्र्राच्या पावनभूमीत रममाण झाले. त्यांनी मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभूत्व मिळविले की, मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. भागवंत संप्रदायातील वारकरी भक्तीरसात त्यांनी स्वत:ला झोकून दिले.
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.
नामदेव, तुकाराम, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. संसारात राहून सुध्दा ईश्र्वर भक्ती करुन परमार्थ साधला जाऊ शकतो हे लोकांना सांगितले. कर्मठ उच्चवर्णियांनी निर्माण केलेली उच्चनीच, जातीभेद ही परंपरा मोडीत काढण्यासाठी उपदेश केला. स्वत:ही तसे वागले. त्यांनी निर्माण केलेले काव्य, अभंग, यांचाच जनतेवर इतका प्रचंड प्रभाव पडला की इतर काही चमत्कारांनी त्यांचे मोठेपण सिध्द करण्याची काहीच गरज नसावी.
नंतर महाराष्ट्र्रातील वास्तव्य संपवून सेना महाराज पुन्हा त्यांच्या जन्मभूमीस तीर्थाटन करीत निघून गेले. त्यांच्या हिंदी भक्तीरचना उत्तरेकडील सर्व हिंदी प्रदेशातून म्हटल्या जातात. महाराजांनी काही रचना पंजाबी भाषेत सुध्दा केल्या आहेत. 'जाता पंढरीसी सूख वाटे जीवा' असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लिन झाला. पंढरी ही त्यांच्या जीवनाचा ध्यास बनली. या महान भगद् भक्ताची श्रावण वद्य द्वादशीला पुण्यतिथी साजरी केली जाते.

आम्ही वारीक वारीक, करू हजामत बारीक !!
विवेक दर्पण आयना दाऊ, वैराग्य चिमटा हालऊ !!
चौवर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत !!  

Monday, 17 April 2017

जनसेवा हीच ईश्वरसेवा संत तुकडोजी महाराज

संत देहाने भिन्न असती, परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती!
साधने जरी नाना दिसती,  तरी सिद्धान्तमति सारखी!
तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे आहे. त्यांचा जन्म एप्रिल २७, १९०९ मध्ये यावली (जि. अमरावती) येथे झाला. त्यांचे आई मंजुळाबाई व वडील बंडोजी व गुरू आडकोजी महाराज होते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की, राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सूचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. ‘आते है नाथ हमारे’ हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
आपली वाणी आणि लेखणी, शक्ती आणि भक्ती यांचे सर्व सामर्थ्य एकवटून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामाजिक जागृतीचे आणि प्रगतीचे प्रयत्न सातत्याने केले. आपल्या देशातील झोपी गेलेली खेडी जागी व्हावीत, अज्ञान, लोकभ्रम आणि सामाजिक निष्क्रियता यामुळे ग्रामीण जीवनाची झालेली दुर्दशा नाहीशी व्हावी, तिथल्या समाजाची सुधारणा व्हावी व सुखी जीवनाच्या दृष्टीने वाटचाल व्हावी, ग्रामस्थांच्या आयुष्यात चैतन्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी कार्य केले. सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने भाग्यशाली असलेला हा देश शिक्षण, आरोग्य आणि धनधान्य याही बाबतीत तितकाच वैभवशाली का नाही, या विचाराने संत तुकडोजी महाराजांचे मन सदैव तळमळत असे. सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली, अनुभव सागर भजनावली हे त्यांचे साहित्य. अंधश्रद्धेवर त्यांनी त्यांच्या लेखनातून, कीर्तनातून प्रहार केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून आपल्या विचारसरणीचा पुरस्कार केला. अशा या महान राष्ट्रसंताने ११ ऑक्टोबर, १९६८ ला देह ठेवला. त्यांचे विचार आजही समाजात जिवंत आहेत.
या झोपडीत माझ्या राजास जी महाली, 
सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, 
या झोपडीत माझ्या !!
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या!!




Monday, 10 April 2017

गणेशभक्त संत मोरया गोसावी

गणेशभक्त संत मोरया गोसावी

चिंतामणी देवा गणपतीसी आणा, करवावे भोजना दुजे पात्री !!
देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमानाभीतरी नागवलो !! 


मोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत. श्री गणेशाचे ते मोठे भक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन होते. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसव तालुक्यातील शाली हे त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव. मोरया यांचे आई- वडील वामनभट शाळिग्राम आणि पार्वतीबाई हे वैदिक कुटुंबातील. ते दोघे पुण्यातील मोरगावला येऊन स्थिर झाले. तेथे कऱ्हा नदीचे खळाळणारे पाणी, मोरयाची भव्य मूर्ती याने भुरळ घातली. त्या परिसराबद्दल काही अद्‍भुत कथा वामनभटांच्या एेकल्या होत्या. ब्रह्मदेवाने मोरगावला तपश्चर्या केली, त्याच्या कललेल्या कमंडलुतून कऱ्हा नदी उगम पावली या कथांमुळे वामनभट प्रभावित झाले होते. त्यांनीही अनुष्ठान मांडले.

 मोरयाने स्वप्नात येऊन सांगितले, की ‘तुझ्या नशिबात पूत्र नाही.’ त्यामुळे वामनभट खट्टू झाले; पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. शेवटी, पार्वतीबाईंचा पाळणा हलला. त्यांनी बाळाचे नाव मोरया हेच ठेवले. मोरया वाढू लागला. त्याची मुंज झाली. त्याचे वेदाध्ययन झाले. त्याच्यात तपश्चर्येची ऊर्मी जागी झाली. त्यांना नयन भारती गोसावी गुरू भेटले. मोरया त्यांच्या प्रेरणेने थेऊरला आले. त्याची तपश्चर्या मुळा-मुठेच्या काठी चिंतामणीजवळ सुरू झाली. 
मोरयाच्या बेचाळीस दिवसांच्या तपश्चर्येनंतर चिंतामणीने मोरयाला दर्शन दिले. मोरयांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी चिंचवड सोडावे, चतुर्थीपर्यंत मोरगावला परत यावे, मोरयाची पूजाअर्चा करावी, पंचमीचे पारणे करून परतावे असा त्यांचा नियम होता. मोरया गोसावींच्या मोरगाव वारीत कधी खंड पडला नाही. मोरया गोसावींना १६१६ पासूनच जमिनी इनाम म्हणून मिळू लागल्या होत्या. त्यांना आदिलशहा, निजामशहा, शहाजीराजे, शिवाजीराजे यांच्याकडून मोरगाव, कुंभार वळण, चिंचवड, चिंचोली या आणि इतर अनेक ठिकाणच्या जमिनी मिळाल्या. संप्रदाय वाढला, अन्नछत्र-सदावर्त, उत्सव-यात्रा, पूजाअर्चा यांचा पसारा वाढला. मोरया गोसावी वयोमानाप्रमाणे थकले.
 मार्गशीर्ष वद्य षष्ठी २५ जानेवारी १६५७ या दिवशी सकाळीच गुंफेत जाऊन बसले. मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली. त्यावर त्यांचे पूत्र थोरल्या चिंतामणी महाराजांनी मोठी शिळा ठेवली आणि त्यावर सिद्धी-ऋद्धीसह मोरयाची मूर्ती बसवली. चिंतामणी महाराजांनी १६५८-५९ मध्ये त्यावर देऊळ बांधले. समाधीच्या प्रवेशद्वारावर कोथळ्याहून आणलेली अर्जुनेश्वर शंकराची मोठी पिंड बसवली.

वाड वेळ झाला शिळे झाले अन्न, 
तटस्थ ब्राह्मण बैसलेती!! 
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, 

आणिन त्वरित मोरयास!!

Sunday, 2 April 2017

श्रेष्ठ कृष्णभक्त संत मीराबाई

श्रेष्ठ कृष्णभक्त संत मीराबाई
पग घुंघरू बांध 
मीरा नाची, रे !
मैं तो मेरे नारायण की, 
आपहि होगइ दासी, रे !
लोग कहें मीरा भई बावरी, न्‍यात कहैं कुल नासी, रे !!
संत मीरा या मध्ययुगीन भारतातील एक श्रेष्ठ कृष्णभक्त संत कवयित्री. त्याचा अर्थ ‘श्रेष्ठ’, ‘श्रीमंत’ असा आहे. त्यांचा जन्म राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका राजपूत कुटुंबात झाला. राव दुदाजी हे मीराबाईंचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दुदाजी मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजी यांचे पुत्र.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दुदाजी यांच्या छत्राखाली मीराचे बालपण गेले. एका आख्यायिकेनुसार, लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला विचारले, की माझा पती कोण होणार? आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि हा तुझा पती असे सांगितले. तेव्हापासून मीरा मूर्तीप्रेमी बनली. तिने या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते. लहान वयातच चित्तोडच्या राणा संगांचा पूत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी लग्न झाले आहे, असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला.१५२७ मध्ये एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगूर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णन करणारी तिची भजने याची साक्ष देतात. सुरवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खासगी बाब होती; पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हटले जाते. ‘विष का प्याला राणाजी भेज्या, पीवत मीरा हाँसी रे’ ! ‘मीरा के प्रभू गिरीधर नागर’ ही तिच्या अनेक पदांत येणारी नाममुद्रा होय. गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविली. त्यानंतर द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली. नाभादास, प्रियादास, ध्रुवदास, मलुकदास, हरिराम व्यास इ. संतचरित्रकारांनी व संतांनी मीराबाईंबद्दल अत्यंत आदराने गौरवोद्‌गार काढले आहेत. मध्ययुगीन राजस्थानी, गुजराती व हिंदी साहित्यात संत कवयित्री म्हणून मीरेचे स्थान अनन्यसाधारण आहे.
पायो जी मैने

राम रतन धन पायो!!