नामा म्हणे आतां देहासी विटला। स्वरूपीं पालटला ज्ञानदेव!!
!!कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती!! संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज
संतश्रेष्ठ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज 729 वा संजीवन समाधी सोहळा उत्सव 2025
सांधकांचा माय-बाप । दर्शने हरे ताप।
सर्वाभूती सुखरूप । ज्ञानोबा माझा ।।
शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, माऊली म्हणजे प्रेम, करुणा आणि अध्यात्म यांचे अद्वितीय स्वरूप होय. वारकरी संप्रदाय अनादिकालापासून अस्तित्वात असला तरी, त्याला लोकाभिमुख करून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य माऊलींनी केले. संत बहिणाबाईंच्या अभंगातील ओळ
"ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया" याचा अर्थ अगदी यथार्थ आहे.
नाथ संप्रदायातील साधना एकांतात, समाधीत लीन होऊन करण्याची परंपरा आहे. माऊली त्या परंपरेतील असले तरी त्यांनी समाजाचा व्यापक विचार करत ज्ञान लोकभाषेत देण्याचा मार्ग स्वीकारला. संस्कृतमधील तत्त्वज्ञान बहुजन समाजाला सहज
कळणार नाही हे जाणून, त्यांनी मराठीत ग्रंथरचना केली.
माझा म-हाठाची बोलू कौतुके! परी अमृताते पैजा जिंके!
यातूनच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, हरिपाठ असे अमूल्य ग्रंथ जन्माला आले.
माझे जीवीची आवाडी, पंढरपुरा नेईन गुढी!
असे म्हणून माऊलींनी वारीची परंपरा दृढ केली. सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र आणून वैष्णव भावनेत सामील केले. संत नामदेव, संत जनाबाई, संत तुकाराम आणि इतर अनेक संतांनी माऊलींबद्दल अपार प्रेम व्यक्त केले आहे.
माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा वारकरी संप्रदायातील अतिपवित्र आणि हृदयस्पर्शी प्रसंग मानला जातो. हा सोहळा कसा झाला, याचे सविस्तर वर्णन संत नामदेव महाराजांनी लिहून ठेवले. त्यामुळे आपल्याला त्या प्रसंगाची स्पष्ट कल्पना येते. पंढरीहून भक्त, वारकरी, साधुसंत मोठ्या संख्येने आळंदीला आले. संपूर्ण परिसरात तीर्थरूप वातावरण होते. स्वयं भगवान पांडुरंग हजर आहेत, असे वर्णन नामदेवांनी केले आहे. माऊली समाधीस्थ झाल्यावर सर्वत्र शोकाचा उद्रेक झाला. संत निवृत्तीनाथांचे दुःख शब्दातीत होते. त्यांच्या ओळींतून त्यांचे मनोभाव समजतात:
अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य-गुरुपण सिद्ध नेले!
नामदेव महाराज म्हणतात
नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ ।।
माऊली समाधीस्थ झाल्यानंतर आळंदीची यात्रा समाप्त झाली. भक्तांनी जयघोष केला आणि देव पांडुरंग नामदेवासह पंढरीला परतले. आळंदी हे संतांच्या प्रेमाने, कृपेने आणि अध्यात्माने भरलेले असे सिद्धस्थान आहे. येथे देव आणि भक्त यांचा दिव्य मिलाप घडतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान म्हणजे सनातन प्रकाशाशी एकरूप होण्याचा क्षण आहे.
समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर । उठविले भार वैष्णवांचे ॥१॥
आळंकापुरीं सव्य घेतली ते संतीं । दिली भागीरथी ज्ञानालागीं ॥२॥
भैरवापासुनि उगम निरंतर । रानोमाळ झरे तीर्थ गंगा ॥३॥
सैघं इंद्रायणी वाहाती मिळोनी । अखंड क्षणीं वोघ जाती ॥४॥
चालिलें विमान गंधर्व सुरगण । यात्रा परिपूर्ण जाली म्हणती ॥५॥
तीर्थ महोत्साह जाला सारासार । देव ऋषीश्वर परतले ॥६॥
वैष्णवांचे भार निघाले बाहेर । केला जयजयकार सर्वत्रांनीं ॥७॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेर । गरुडावरी स्वार देव जाले ॥८॥
नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर । जाला असे स्थिर ब्रह्मबोधें ॥९॥
सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज की जय!👏🏻👏🏻












