Sunday, 23 July 2017

भक्तीनिष्ठ ‘संत वेणाबाई’

भक्तीनिष्ठ ‘संत वेणाबाई


बहू कष्टलो पातलो जी स्वदेशा !
प्रजा बोलती कौल दे राघवेशा !!
संत वेणाबाई यांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये झाला. त्या मुळच्या मिरज येथील देशपांडे यांच्या कन्या. विवाहानंतर कोल्हापूरला गेल्या व काही काळातच, वयाच्या दहाव्या वर्षी विधवा झाल्या. तेथेच त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले. नंतर त्या मिरज येथे परत आल्या. समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती. मळलेली वात सोडून समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या सर्वच संतांना जननिन्देला सामोरे जावे लागते. समर्थ त्याला अपवाद नव्हते. वेणाबाई, अक्काबाई,अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले. वेणाबाईंना तर खूप त्रास सहन करावा लागला. त्यांचे समर्पण म्हणजे एक कसोटीच होती. कोल्हापूर हे त्यांचे माहेर तर मिरज हे सासर होते. समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात. तिथे त्यांची नेहमी कीर्तने होत. वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात. सासू-सासरे एकनाथ महाराजांचे अनुगृहीत होते. त्यामुळे घरातून कोणताच विरोध नव्हता.

समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत. त्या काळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला चाफळात ठेऊन उत्सवाची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात असे. एक वर्ष ही जबाबदारी वेणास्वामींच्यावर सोपविण्यात आली. नेतृत्वाचे गुण प्रत्येक माणसामध्ये असतात. विशिष्ट पद्धतीने त्याचा विकास घडवून आणावा लागतो. वेणाबाईंनी मठाची जबाबदारी स्वीकारली. समर्थांनी पाठवलेली भिक्षा कोठीघरात व्यवस्थित लावून ठेवणे अशी विविध कामे करावी लागत. रामरायाची ही सेवा वेणाबाई मनापासून करीत असत. त्यांना त्यांच्या सेवेची पावती द्यावी, असे रामचंद्रांच्या मनात येऊन गेले. ऐन उत्सवाच्या १५ दिवस आधी वेणाबाई आजारी पडल्या. त्या तापाने एवढ्या फणफणल्या की, त्यांना चालताही येईना. ज्याप्रमाणे नाना रूपे धारण करून संत जनाबाई, संत एकनाथ या संतांची सेवा केली त्याप्रमाणे रामचंद्रांनी रामबाईंच्या रूपात येऊन उत्सवाची सर्व तयारी केली. मी बत्तीस शिराळ्याची असून रामदास स्वामींनी मला तुमच्या मदतीसाठी पाठविले आहे, असे रामाबाईंनी वेणाबाईंना खोटेच सांगितले. समर्थ भिक्षेहून परतल्यावर सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि रामाबाई ही गुप्त झाल्या.

वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे. रामदासस्वामींनी इ.स. १६५६ मध्ये बांधलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे.‘धन्य वेणाई वेणुमोहित !
वेणुविण गाय सप्रेमयुक्त !!

Saturday, 15 July 2017

भोळी-भाबडी संत सखू

भोळी-भाबडी संत सखू

बा रे पांडुरंगा, केव्हा भेट देसी !!
झाले मी परदेसी, तुजविण !!


कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे. फार वर्षांपूर्वी तेथे सखूचे सासर होते. तिच्या पतीचे नाव दिगंबर. तीची सासू सखूला फार त्रास देत असे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची सासू तिला कामाला जुंपून ठेवी. सारे काम करूनही सासूची बोलणी ही नित्याचीच असत. सखू मात्र हे सारे निमूटपणे सहन करी. भोळी-भाबडी सखू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी. तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचेच नाम असे.
एकदा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली. दिंडी कृष्णेच्या तिरावर थांबली. 

तेथे वारकऱ्यांचे भजन चालू झाले. महाराज कीर्तन करायला उभे राहिले. नेमकी त्याच वेळी सखू नदीवर पाणी भरण्यासाठी आली होती. कीर्तनकार पंढरीचा महिमा वर्णू लागले. पांडुरंगाची थोरवी गाऊ लागले. विठ्ठलनाम कानावर पडताच सखूचे लक्ष तिकडे गेले. महाराजांचे कीर्तन ऐकण्यात ती तल्लीन झाली. सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटू लागले. तिला विठ्ठलदर्शनाची अनिवार ओढ लागली. त्या निश्चयाच्या भरात सखूने आपली घागर शेजारणीजवळ दिली आणि घरी नेऊन देण्यास सांगितले. ती दिंडीसमवेतच पुढे निघाली. विठ्ठलनामाच्या जयघोषात सखू अगदी दंग झाली.
इकडे शेजारणीने सखूच्या घरी घागर नेऊन दिली. सासूने शेजारणीला विचारले, सखू कुठे गेली ? शेजारणीने सारे वृत्त कथन केले. ते ऐकून सासूला फारच राग आला. संतापाने ती लाल झाली. तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि ताबडतोब सखूला घेऊन येण्यास सांगितले. दिगंबराने भराभर चालत जाऊन दिंडी गाठली आणि सखूला मारझोड करतच घरी घेऊन आला. दोघांनी मिळून तिला एका खोलीत कोंडून ठेवले. तिला अन्नपाणीही द्यायचे नाही, असे त्यांनी ठरवले. सखूला वाईट वाटले ते या गोष्टीचे की, आता पांडुरंगाचे दर्शन होणार नाही. तिने पांडुरंगाचा धावा चालू केला. व्याकुळ होऊन ती पांडुरंगाला आळवू लागली.

सखूची निस्सीम भक्ती आणि भोळया भावामुळे पांडुरंग तिच्यावर प्रसन्न झाला. पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाली. तिला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच तिने आपले प्राण ठेवले. दिंडीस आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले. पंठरीत ज्या गावकऱ्यांनी सखूचे अंत्यसंस्कार केले होते, ते सखूच्या घरी आले, तर सखू त्यांना घरकाम करतांना दिसली. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी सखूच्या नवऱ्याला आणि सासूला सारा वृत्तांत सांगितला. तो ऐकून त्यांनी सखूला खरा प्रकार काय आहे, ते विचारले. सखूने सारी घटना कथन केली. ती ऐकून गावकरी स्तब्ध झाले. तिच्या नवऱ्याला आणि सासूला पश्चात्ताप झाला. अस्या या महान संताची समाधी कराड नगरीत कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमावर आहे. आजही पंढरपूरला निघालेले वारकरी आवर्जून सखूबाईच्या समाधीचे दर्शन घेतात.

तुजविण सखा, मज कोणी नाही !!
वाटते चरणी, घालावी मिठी !!
ओवाळावी काया, चरणावरोनी !!

Sunday, 9 July 2017

मज हृदयी सद्‍गुरु ...!!

मज हृदयी सद्‍गुरु ...!!


मज हृदयी सद्‍गुरु ! तेणेची तारिलो हा संसारपुरू !!
म्हणोनी विशेषें अत्यादरू ! विवेकावरी।। ज्ञानेश्वरी !!
आपली प्राचीन संस्कृती गुरू-शिष्याच्या परंपरेने हजारो वर्षांपासून जीवंत राहिलेली आहे. संस्कृतीचा प्राण म्हणजे श्रीगुरु-शिष्य परंपराच. वेदकालापासून आपणास ही पवित्र परंपरा ज्ञात आहे. या परंपरेचा स्त्रोत विशेष प्रकर्षाने समाजापुढे आदर्शपणे, वारकरी संप्रदायाने जपून ठेवून तो समाजाच्या तळागाळापर्यंत नेला आहे. आज महाराष्ट्रात 'विठ्ठलभक्ती' प्राधान्याने केली जाते. त्याचा प्रभावी प्रवाह संतकाळापासून दिसून येतो. अनेक शतकापासून ही विठ्ठल भक्ती फोफावलेली आहे. श्रीगुरु परंपरेमुळेच ती समाजात नेऊन रुजवली, फुलविली.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूदेवांबरोबरच भगवान व्यासांचीही पूजा केली जाते.

 व्यासांचे पूर्ण नाव कृष्णद्वैपायन आहे. वेदांचे विभाग केल्यामुळे त्यांना व्यास किंवा वेदव्यास असे म्हटले जाते. महर्षि पाराशर व्यासांचे पिता आणि सत्यवती त्यांची आई होती. व्यासांना देवाचा अवतार मानले जात असून ते अमर आहेत. द्वापार युगाच्या शेवटी व्यास प्रकट झाले होते, असे म्हणतात. कलियुगात मनुष्याची शारिरीक आणि बौद्धिक ताकद कमी होईल. त्यामुळे या काळातील मनुष्यप्राण्याला सर्व वेदांचा अभ्यास करणे शक्य होणार नाही. ते समजूनही घेता येणार नाही, हे ओळखून व्यासांनी वेदांचे चार विभाग केले. जे लोक वेद वाचू, समजू शकत नाही त्यांच्यासाठी त्यांनी महाभारत लिहिले.
महाभारतात वेदाची सर्व माहिती आहे. धर्मशास्त्र, नितीशास्त्र, उपासना आणि ज्ञान-विज्ञानाच्या सर्व बाबी महाभारतामध्ये आहेत. याव्यतिरिक्त पुराणांमधील कथांद्वारे आपला देश, समाज किंवा धर्माचा पूर्ण इतिहास समजतो. महाभारताच्या कथा मोठ्या रोचक आणि उपदेशात्मक आहेत.
मनुष्याचे कल्याण व्हावे, या भावनेतून व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली. पुराणात देवांची सुंदर चरित्रे आहेत. भाविकांच्या देवांप्रती असलेल्या भक्तीच्या कथा पुराणात आहेत. या व्यतिरिक्त व्रत, विधी, तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य, ज्ञान, वैराग्य, भक्ती, नीती आदी विषयांनी पुराण भरले आहे.

हिंदू धर्माची सर्व अंगे व्यासांनी पुराणात सामावली आहेत. विद्वानांसाठी त्यांनी वेदांत दर्शनाची रचना केली. वेदांत दर्शन लहान-लहान सूत्रात असून ते इतके अवघड आहे की, त्यांचा अर्थ समजण्यासाठी मोठे ग्रंथ लिहिले गेले आहेत. या त्यांच्या कर्तृत्वामुळे गुरूपौर्णिमेच्या दिवशी व्यासांची पूजा केली जाते.

Tuesday, 4 July 2017

पंढरपुरीचा निळा

पंढरपुरीचा निळा..!!
(लेखक- -पुष्कर म. गोसावी जहागीरदार ,संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज )



पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा 
विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥
पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. शहराला अर्धचंद्राच्या आकाराने भीमा नदीने वळसा घेतलेला आहे, म्हणून या नदीला चंद्रभागा असेही म्हटले जाते. त्याच्यामागेही मोठी अख्यायिका आहे. वारकरी संप्रदायात या नदीला चंद्रभागा या नावानेच ओळखले जाते.  संतांच्या अभंगातूनही या नदीचे वर्णन चंद्रभागा किंवा भिवरा असेच केल्याचे दिसून येतय. अशा या पंढरपूरचा उल्लेख प्राचीन ग्रंथातही सापडतो. शालिवाहन राजांच्या काळात इ.स. ८३  मध्ये या शहराचे संवर्धन केल्याचे दाखले सापडतात. तर इ.स ५१६ मध्ये राष्ट्रकुटांच्या काळातही पंढरपूरचा उल्लेख आढळून येतो. पंढरपूर अत्यंत प्राचीनकाळापासून असल्याचे अनेक दाखले सापडतात. तो इतिहासाचा विषय आहे.
 त्यावर जास्त लिहित नाही. इतिहासातल्या थोर व्यक्तिमत्त्वांनीही या पंढरपूरला भेट दिल्याचे दाखले आहेत. ग्वाल्हेरचे शिंदे, बाजीराव पेशवे, अहिल्यादेवी होळकर यांच्यासह अनेक राजे महाराजे आणि सरदारांनी या विठ्ठलाला मौल्यवान दागिने अर्पण केलेले आहेत. हिरे, माणिक, मोती, सोनं या दागिन्यांचा खजाना आजही मंदिराच्या विश्वस्तांकडे आहे. यावरूनच हे दैवत किती प्राचीन आहे याची प्रचिती येते
.
भीमानदीच्या काठावरच विठ्ठल रुखमाईचे भव्य मंदिर आहे. सोलापुरातून तुम्ही गोपाळपूरच्या जुन्या दगडी पुलाच्या मार्गाने जर पंढरपुरात प्रवेश केला तर तुम्हाला लांबूनच कळसाचे दर्शन होते. मंदिराच्या समोरच नामदेव पायरी आहे. विठोबाचे दर्शन घेण्याअगोदर नामदेव पायरीचे दर्शन घेतले जाते. तर मंदिराच्या अगदी समोर नदीपात्रात पुंडलिकाचे मंदिर आहे. या दोन्हीबद्दल वारकरी साहित्यात मोठी माहिती देण्यात आलेली आहे. पंढरपूरला येणाऱ्या भक्तांना वारकरी म्हणतात. या वारकरी संप्रदायात तुळसीची माळ घालण्याची परंपरा आहे. त्यांना माळकरीही म्हणतात. काळा बुक्का हा विठ्ठलाच्या नावाने कपाळी लावला जातो.

 पंढपुरात आलेला वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतो. सध्या सगळ्याचे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या नद्यांची जी अवस्था आहे. तीच या भीमानदीचीही झालेली आहे. प्रदूषणाने नदीचे पाणी गढूळ झालय. पण वारकरी या नदीत डुबकी मारूनच विठोबाचे दर्शन घेतात.

उदंड पाहिली उदंड ऐकिली । उदंड वर्णिली क्षेत्र ख्याती ॥१॥
ऐसी चंद्रभागा ऐसें भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठें ॥२॥

मी पंढरीचा वारकरी...!!

मी पंढरीचा वारकरी...!!



पंढरीशी जारे आल्यानो संसारा,  दिनाचा सोयरा पांडुरंग !

वाट पाहे उभा भेटीशी आवडी,  कृपाळू तातडी उतावीळ !
ज्ञानेश्वरीमध्ये ‘वारी’ म्हणजे येरझारा. वारकरी संप्रदायात पंढरीच्या वारीला महत्त्व आहे. वर्षातून एकदा वारकऱ्याने पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घ्यावे; असा नियम आहे. गळ्यांत तुळशीमाळा, कपाळी बुक्का, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन, खांद्यावर पताका आणि हातात टाळ-मृदुंग अशा थाटात वारकरी वारीला जाताना दिसतात. पंढरपूरच्या वारीचा हा सोहळ. अभूतपूर्व असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे ते एक अंग आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून हा सोहळा चालतो. याचे नियोजन ज्ञानेश्वर संस्थानातर्फे केले जाते. दरवर्षी ज्येष्ठ वदय अष्टमीला आळंदीहून विधिपूर्वक पालखीचे प्रस्थान होते.

 आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरात तिचे आगमन होते. आषाढ पौर्णिमेपर्यंत पंढरपूरात माऊलीचा उत्सव असतो. आषाढ वद्य एकादशीला पालखीचा परतीचा प्रवास सुरू होऊन आषाढ वदय दशमीला पालखी आळंदीला परत येते. वारीच्या मध्यभागी ज्ञानदेव माऊलीच्या चांदीच्या पादुका ठेवलेला रथ असतो. रथापुढे मानाच्या सत्तावीस दिंड्या असतात. मान्यता मिळालेल्या अन्य दिंड्या रथाच्या मागे असतात अर्थात पहिली दिंडी माऊलीची असते. भजन कीर्तन करीत वारकरी मार्गस्थ होत असतात. 


वारीची ही एक पदयात्राच असते तिचा मार्ग ठरलेला, मुक्काम ठरलेले असतात. ठरावीक मुक्कामाच्या ठिकाणी, माऊलींच्या घोड्यांची रिंगणे होतात. पहिले उभे रिंगण ‘चांदोबाचा लिंब’ येथे, लोठांद- तरडगांव या मार्गावर होते. दुसरे गोल रिंगण ठाकूरबुवांच्या समाधीजवळ, भंडी -शेगाव या गावाजवळ खुडसफाटा येथे होते. वाखरी पंढरपूर या गावाजवळ शेवटची रिंगणे होतात. वाटेत माऊलीच्या पादुकांना नीरा नदीत स्नान व पौर्णिमेला स्नानानंतर विठ्ठल रखुमाई यांच्या चरणी भेट हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो.
पंढरीच्या वारीची वैशिष्ट्ये :

दिंडी : प्रत्येक दिंडीमध्ये एक वीणेकरी एक पखवाज वादक असतो. दिंडीपुढे पताकाधारी वारकरी असतो.


रिंगण : वारीला पायी जाताना येणारा थकवा जाण्यासाठी एकूण सहा ठिकाणी रिंगण घातली जातात. 

कीर्तन : वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक संत नामदेव मानले जतात. यापद्धतीत इतर कीर्तनासारखा पूर्वरंग, उत्तररंग, आख्यान असे काही नसते. या कीर्तनात सांप्रदायिक भजनाला प्राधान्य असते. कीर्तनात मृदुंग, टाळ, पखवाज व वीणा एवढी वाद्ये असतात. आणि देव, संत, नाममहात्म्य, गुरुकृपा असेच विषय असतात. सुरवातीला मागे टाळकरी उभे राहून ‘‘सुंदर ते ध्यान’’ हा अभंग म्हणून कीर्तन सुरू करतात.