सामाजिक एकतेचे दर्शन ‘पंढरीची वारी’
संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा !!
जावे पंढरीशी आवडे मनाशी, कई एकादशी आषाढी ये !!
पंढरीच्या वारीला अनेक शतकांची प्रदीर्घ परंपरा आहे. ‘सकळासी येथे आहे अधिकार’ म्हणत वारकरी संतांनी अठरापगड जातीत विखुरलेला समाज विठ्ठलभक्तीच्या उदात्त अशा स्नेहधर्माने चंद्रभागेच्या वाळवंटी एक केला. एकत्र भजन, एकत्र स्वयंपाक, एकत्रित भोजन यामुळे वारकरी आचारधर्मात जाती-वर्णभेदाला स्थानच नाही. येथे जाती नव्हे तर भक्ती प्रमाण मानली गेली. तुका म्हणे नाही जातीसवे काम, ज्या मुखी नाम तोचि धन्य! हे संतवचन वारीतील सामाजिक समतेचे अधिष्ठान आहे. या दृष्टीने वारी म्हणजे समतेचे, समरसतेचे विराट दर्शन आहे. पंढरीची वारी हे सुकृत दर्शनी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठलाच्या उपासनेचे भक्ती-ज्ञानाधिष्ठित व्रत आहे, पण या व्रताची या उपासनेची सामाजिक फलश्रुती विचारात घेता पंढरीची वारी हे सामाजिक समतेचे, एकतेचे आणि समरसतेचे विराट दर्शन आहे.
दरवरर्षी दिंडीत लाखो लोक पायी वारीत सामील होतात. आपले घरदार, कामधंदा सोडून ते पंढरीच्या वाटेवर येतात. हे का येत असावे असा प्रश्न लोक विचारतात. त्यांचेही बरोबर आहे. या दिंडीच्या वाटेवर ना चांगली राहण्याची व्यवस्था, ना झोपण्याची सोय, पण तरीही लक्षावधी जनांचा प्रवाहो एका विठ्ठल नामाच्या मंत्राने प्रवाहित होऊन चालत असतो. त्याच्या चालण्याला ग्यानबा-तुकारामचा ठेका असतो. टाळ- मृदुंगातून उमटणारा जय जय रामकृष्ण हरीचा गजर असतो, त्यामुळे कोणत्याही लौकिक सुविधांची पर्वा करायला त्याच्याकडे वेळच नसतो. वारकऱ्यांचे सारे लक्ष विठ्ठलनामात गुंतलेले असते आणि नामातून, भजनातून, कीर्तनातून मिळणारा आनंद फक्त त्याच्यापुरता नसतो, तर तो अवघ्या आसमंतात साठलेला असतो. दिंडी जसजशी पुढे सरकते तसा सगळीकडे उसळतो विठ्ठल नामाचा नाद-गंध. पावसाच्या शिडकाव्याने सारा परिसर आधीच अभिमंत्रित झालेला, त्यावर एक वर्ख चढवा तद्वत नामाच्या कल्लोळाने चराचरावर एक प्रकारचा हळवा ओलावा पसरलेला असतो.
रस्त्यावरील माती ज्याच्यासाठी अबीर-गुलाल त्या वारकऱ्यांचा अवघा देह पदोपदी नाचत-गात बोलत असतो. दिंडी ही अशी बेभानपणे अनुभवायची असते, आत्मभान जागवत जगायची असते. वारीत सगळ्याचा विसर पडतो, दिंडीतील प्रत्येक पावलागणिक तुमचे पद, प्रतिष्ठा, परिवार सगळे काही मागे पडत असते, कारण वारकऱ्यांची नजर पंढरीच्या पांडुरंगाकडे लागलेली असते, कानात संतांच्या अभंगवाणीचा गजर घुमत असतो.
वारकऱ्यांचा धर्म अगदी वेगळा आहे. तेथे कर्मकांडाला स्थान नाही. संतांच्या म्हणण्यानुसार जो चांगला वागतो, जगतो तोच वारकरी. मग त्याच्या गळ्यात माळ असो नसो. कारण कपाळी अबीर, चंदन लावल्याने किंवा गळ्यात तुळशीमाळ घातल्याने वैष्णवांच्या मेळ्यात सामील होता येत नाही. तेथे कापरासाख्या निर्मळ मनाची गरज असते.
संसार पसारा, विषयांचा मारा !!
दु:खांचा भारा, माझ्या डोई !!