Sunday, 14 May 2017

आत्मज्ञानदीप प्रज्वलीत करणारे संत : बंकटस्वामी महाराज

संत संगतीचे काय सांगू सुख !
आपणा पारिखे नाही तेथे !!
साधू थोर जाना साधू थोर जाना..!!

बंकटस्वामी महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत. त्यांनी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे काम केले. श्री. स्वामी महाराजांचा जन्म मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्यात शके १७९९ मध्ये निनगुर गावी झाला. (बुंदेलखंडातून येथे वास्तव्यास आलेल्या राजपूत घराण्यांमध्ये महाराजांचा जन्म झाला) स्वामी महाराजांचे जन्माबाबात असे सांगण्यात येते की, स्वामी महाराज आपल्या आईच्या गर्भात १८ महिने होते. प्रसूतीसाठी व्याकूळ व चिंतातूर असणारी माता रन्नदेवी व पिताजी निहालसिंग यांनी सुखरूप व लवकर प्रसूती व्हावी म्हणून कुलदैवत श्री व्यंकटेशाची प्रार्थना केली आणि बालकाचा जन्म होताच श्री व्यंकटेशाचा प्रसाद म्हणून मुलाचे नांव व्यंकटेश ठेवले पण रजपूत घराण्यांचे परंपरेनुसार त्या नावांमध्ये सिंग हे लावून त्याला व्यंकटसिंग असे नावाने ओळखले जाऊ लागले. परंतु, याही नावाचा अपभ्रंश पुढें बंकटसिंग असा झाल्यामुळे लोक त्यांना बंकटसिंगच म्हणू लागले. महाराज गुणाबरोबरच व्यवहार कुशलता, चातुर्य, प्रसंगावधान, हुशारी, उत्तम सचोटी व सत्त्वशील वृत्ती इ. हे गुणसुद्धा त्यांचे ठिकाणी जन्मजात होते.
वारकरी पंथाची पताका उंचउंच चिरकाल फडकत रहावी म्हणून गुरुवर्य जोग महाराजांनी १९१९ साली स्वतः ११ हजार रुपये देणगी देत पवित्र इंद्रायणीच्या जलतुषाराने पावन व श्री ज्ञानचक्रवर्ती ज्ञानदेवांच्या समाधीमुळे अलंकृत झालेल्या आळंदी क्षेत्रांमध्ये वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. तेथे श्री मामासाहेब दांडेकर, श्री लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, श्री मारोतीबुवा गुरव व श्री. बं. स्वामी महाराज हे चार आधारस्तंभ नेमून दिले. शके १८४१ इ.स.१९२० साली गु. जोग महाराज ब्रह्मस्वरूपी लीन झाले. स्वामी प्रत्येक अधिकमासांत पंढरपुर, पैठण, नासिक इ. एकेका क्षेत्रांत महिनाभर मोठा सप्ताह करून अन्नदान करीत. दररोज साधारण दहा हजार बाहेरगावांचे लोक टाळकरी व त्या गावांतील रोज एकेक गल्ली जेवणास रहात असे. शेवटीचे दिवशी संपूर्ण मुक्ताद्वार राही. त्यामुळे भरपूर अन्नदान होत असे. सर्व दिवसांच्या पंक्ती बहुतेक नेमलेल्याच असत. श्री. स्वामींनी आपले जीवन केवळ ईश्‍वरसेवेसाठी समर्पण केले होते. 
धर्मप्रचार आणि संप्रदाय प्रचारार्थ स्वामी महाराज गावोगाव उन्हातान्हात पायी फिरत, पण बरोबर घोडे-गाडी इ. अनेक साधने असूनही त्यांत ते बसत नसत. रात्री कीर्तनासाठी तीन-तीन तास उभे राहत. आषाढीचे वेळी काही दिवस देहूवरून श्री. तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याबरोबर व नंतर दौंडकडून पंढरपूरला श्री स्वामी दिंडी आणीत व कार्तिक वारीला निनगुरहून कार्तिक शु.१ ते शुद्ध दशमीपर्यंत १५ दिवस पायी दिंडी आणीत. याही वेळी शेकडो गोड्या-घोडे इ. साधने बरोबर असूनही त्यात न बसता पायी भजन म्हणून चालत असत. महाराजांनी अखंड वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार केला. शेवटी इ.स. १९४४ ला या भगवद भक्ताचे महानिर्वाण झाले.
ईश्‍वराने प्रदान केलेल्या आपल्या ६७ वर्षांच्या आयुष्याचे स्वामी महाराजांनी अक्षरशः सोने केले, विठोबाचे दास होऊन हरिभजनाने जग धवळून काढले. तर कीर्तन प्रवचन सेवेने ठायी ठायी आत्मज्ञानीदीप प्रज्वलीत केले. दिंडी सप्तहादी उपक्रमाद्वारे वैष्णांची मांदियाळी मेळविली. 

No comments:

Post a Comment