Sunday, 21 May 2017

कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच

कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ! रखुमाईच्या पती सोयरिया !!
गोड तुझें रूप गोड तुझें नाम ! देईं मज प्रेम सर्व काळ!!


महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत. संत भगवानबाबा यांचा जन्म २९ जुलै, इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा येथे झाला. ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते. जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नंतरच्या कालखंडात संतपदाला पोचलेले ते पहिले महापुरुष आहेत. त्यांना स्वतः तुकाराम महाराज यांनीच स्वप्नबोध केला होता, असे मानले जाते. तुकारामोत्तर कालखंडात वारकरी धर्माला प्रेरणा देण्याचे महान कार्य त्यांनी केले. ते संत एकनाथांच्या परंपरेतील नाथफडाचे प्रसिद्ध टाळकरी संत होते. ते भागवत धर्माचा झेंडा फडकाविणारे एक प्रबोधनकर्ते कीर्तनकार होते. त्यांच्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, त्यांनी पाण्यावर तरंगून ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते.
भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच’ असे लोक गौरवाने म्हणत. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यांच्या ऐश्वर्यशाली व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व कार्याचा त्यांच्या काळातील समाजावर फार मोठा प्रभाव पडलेला होता व तो तेवढाच परिणामकारकपणे आजही अनुभवास येतो. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा समाज आहे. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली. सर्वधर्मसमभाव, अंधश्रद्धानिर्मूलन, शिक्षणप्रसार, वार्षिक नारळी हरिनामसप्ताह, पंढरपूरवारी यासारखे जनकल्याणचे काम करणारे एक आदर्श समाजमार्गदर्शक, समाजसुधारक होते. भगवानगडाची संस्थापना त्यांनी केली. भगवानगड आज वारकरी धर्म चळवळीचे मोठे केंद्र बनले आहे. महाराजांनी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी इहलोकीची यात्रा संपवून वैकुंठगमन केले. प्राणत्याग करताना त्यांनी वारकरी महावाक्याचा जयघोष केल्याचे सांगितले जाते.
विठो माउलिये हाचि वर देईं ! संचरोनि राहीं हृदयामाजी!!
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक! तुझे पायीं सुख सर्व आहे!!

Sunday, 14 May 2017

आत्मज्ञानदीप प्रज्वलीत करणारे संत : बंकटस्वामी महाराज

संत संगतीचे काय सांगू सुख !
आपणा पारिखे नाही तेथे !!
साधू थोर जाना साधू थोर जाना..!!

बंकटस्वामी महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत. त्यांनी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे काम केले. श्री. स्वामी महाराजांचा जन्म मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्यात शके १७९९ मध्ये निनगुर गावी झाला. (बुंदेलखंडातून येथे वास्तव्यास आलेल्या राजपूत घराण्यांमध्ये महाराजांचा जन्म झाला) स्वामी महाराजांचे जन्माबाबात असे सांगण्यात येते की, स्वामी महाराज आपल्या आईच्या गर्भात १८ महिने होते. प्रसूतीसाठी व्याकूळ व चिंतातूर असणारी माता रन्नदेवी व पिताजी निहालसिंग यांनी सुखरूप व लवकर प्रसूती व्हावी म्हणून कुलदैवत श्री व्यंकटेशाची प्रार्थना केली आणि बालकाचा जन्म होताच श्री व्यंकटेशाचा प्रसाद म्हणून मुलाचे नांव व्यंकटेश ठेवले पण रजपूत घराण्यांचे परंपरेनुसार त्या नावांमध्ये सिंग हे लावून त्याला व्यंकटसिंग असे नावाने ओळखले जाऊ लागले. परंतु, याही नावाचा अपभ्रंश पुढें बंकटसिंग असा झाल्यामुळे लोक त्यांना बंकटसिंगच म्हणू लागले. महाराज गुणाबरोबरच व्यवहार कुशलता, चातुर्य, प्रसंगावधान, हुशारी, उत्तम सचोटी व सत्त्वशील वृत्ती इ. हे गुणसुद्धा त्यांचे ठिकाणी जन्मजात होते.
वारकरी पंथाची पताका उंचउंच चिरकाल फडकत रहावी म्हणून गुरुवर्य जोग महाराजांनी १९१९ साली स्वतः ११ हजार रुपये देणगी देत पवित्र इंद्रायणीच्या जलतुषाराने पावन व श्री ज्ञानचक्रवर्ती ज्ञानदेवांच्या समाधीमुळे अलंकृत झालेल्या आळंदी क्षेत्रांमध्ये वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. तेथे श्री मामासाहेब दांडेकर, श्री लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, श्री मारोतीबुवा गुरव व श्री. बं. स्वामी महाराज हे चार आधारस्तंभ नेमून दिले. शके १८४१ इ.स.१९२० साली गु. जोग महाराज ब्रह्मस्वरूपी लीन झाले. स्वामी प्रत्येक अधिकमासांत पंढरपुर, पैठण, नासिक इ. एकेका क्षेत्रांत महिनाभर मोठा सप्ताह करून अन्नदान करीत. दररोज साधारण दहा हजार बाहेरगावांचे लोक टाळकरी व त्या गावांतील रोज एकेक गल्ली जेवणास रहात असे. शेवटीचे दिवशी संपूर्ण मुक्ताद्वार राही. त्यामुळे भरपूर अन्नदान होत असे. सर्व दिवसांच्या पंक्ती बहुतेक नेमलेल्याच असत. श्री. स्वामींनी आपले जीवन केवळ ईश्‍वरसेवेसाठी समर्पण केले होते. 
धर्मप्रचार आणि संप्रदाय प्रचारार्थ स्वामी महाराज गावोगाव उन्हातान्हात पायी फिरत, पण बरोबर घोडे-गाडी इ. अनेक साधने असूनही त्यांत ते बसत नसत. रात्री कीर्तनासाठी तीन-तीन तास उभे राहत. आषाढीचे वेळी काही दिवस देहूवरून श्री. तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याबरोबर व नंतर दौंडकडून पंढरपूरला श्री स्वामी दिंडी आणीत व कार्तिक वारीला निनगुरहून कार्तिक शु.१ ते शुद्ध दशमीपर्यंत १५ दिवस पायी दिंडी आणीत. याही वेळी शेकडो गोड्या-घोडे इ. साधने बरोबर असूनही त्यात न बसता पायी भजन म्हणून चालत असत. महाराजांनी अखंड वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार केला. शेवटी इ.स. १९४४ ला या भगवद भक्ताचे महानिर्वाण झाले.
ईश्‍वराने प्रदान केलेल्या आपल्या ६७ वर्षांच्या आयुष्याचे स्वामी महाराजांनी अक्षरशः सोने केले, विठोबाचे दास होऊन हरिभजनाने जग धवळून काढले. तर कीर्तन प्रवचन सेवेने ठायी ठायी आत्मज्ञानीदीप प्रज्वलीत केले. दिंडी सप्तहादी उपक्रमाद्वारे वैष्णांची मांदियाळी मेळविली. 

Monday, 8 May 2017

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो : संत जगनाडे महाराज

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो : संत जगनाडे महाराज

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो, तेली जन्मा आलो घाणा घ्याया।।
नाही तर तुमची आमची एक जात, कमी नाही त्यात अणु रेणु।।
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे, स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे।।
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म आठ डिसेंबर १६२४ ला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मावळ या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठल भक्त होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले व धार्मिक बाजूकडे त्यांना आवड निर्माण झाली. त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. त्या काळी बाल विवाहाची परंपरा असल्यामुळे त्यांचा वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईंशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले होते. त्या काळी संतांचे समाजाला कीर्तने अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा संत तुकाराम महाराज संताजींच्या गावी मावळला कीर्तनासाठी आले होते. तिथे संत तुकारामांचा प्रभाव संताजींवर खूप मोठ्या प्रमाणात पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. 
तेव्हा संत तुकारामांनी संताजींना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. तेव्हापासून संत संताजी जगनाडे महाराज हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी म्हणून ओळखले जाऊ लागले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांची अभंगे लिहिण्यास सुरवात केली.
 संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता. संत तुकाराम महाराज हे संत संताजी जगनाडे महाराजांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. पण ज्यावेळी संत संताजी महाराजांचा अंत समय आला त्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते. त्यांचा चेहरा हा राहत होता तेव्हां वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले होते अशी अख्यायिका आहे. तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला. तो काळ होता इ.स. १६८८.
देह क्षेत्र घाणा ऐका त्याच्या खुणा, गुदस्थान जाणा उखळ ते ।।
 स्वाधिष्टानावरी मन पुरचक्र, विदुं दंत चक्र आनु हात ।। 
संतु म्हणे माझा घाणा हो देहांत, चालवि आपोआप पांडुरगं ।।