देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी !! देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई !!
देव अंतरात नांदे, दे दही दिशा कोंडे !! देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी!
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस असे म्हटले जाते. तर संत गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले आहे. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता.
विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल मृत्यू वारले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी गावकऱ्यांना शिकविला. १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला आहे.
देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. गाडगे बाबांनी अनेक धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषानेअमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या काठावर २० डिंसेंबर १९५६ आपला देहा ठेवला.
देव शोधोनिया पाही, देव सर्वांभूता ठाई !!
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे !!
No comments:
Post a Comment