शुद्ध ज्याचा भाव झाला ! दुरी नाही देव त्याला !!
अवघी साधन हातवटी ! मोले मिळत नाही हाटी !!
संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची येथे इ.स.१२७९ मध्ये झाला. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ. परंतु, संत मुक्ताबाईचे स्वतःचेही स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या ताटीच्या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना उपदेश केला आहे.
योगी पावन मनाचा ! साहे अपराध जनाचा !!
विश्वरागे झाले वन्ही ! संती सुखे व्हावे पाणी !!
संत मुक्ताबाई ह्या योगी चांगदेवांच्या गुरू. आपल्या भारतीय वैदिक संस्कृतित स्त्री ही देवतास्वरुप मानली जाते. देवी स्वरुपात तिचे पूजन केले जाते. आदिमाता, दुर्गामाता, महिषासूरमर्दिनी, महाकाली, महालक्ष्मी, पार्वती, महासरस्वती, महादेवी अशी ह्या स्त्रीदेवतांची अनेक रुपे आणि अनेक नावे आहेत. स्त्री ही सृजनाची शक्ती आहे. सर्व विश्वाची जननी आहे. ती पूजनीय आणि प्रार्थनीय आहे. आपल्या प्राचीन पुराणकाळातील अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी ह्या देवतास्वरुप स्त्रिया प्रातःस्मरणीय मानल्या जातात. त्याचप्रमाणे अलिकडच्या कालखंडातील म्हणजे सतराव्या शतकापर्यंतच्या कालखंडातील पाच संतस्वरुप स्त्रियादेखील वंदनीय आहेत.
महानुभाव पंथातील चक्रधर स्वामींची शिष्या महादाइसा, संत निवृत्तीनाथांची धाकटी बहीण मुक्ताबाई, संत नामदेवांची दासी जनाबाई, संत तुकारामांची शिष्या बहिणाबाई आणि समर्थ रामदास स्वामींची शिष्या वेणाबाई. ह्या पाच स्त्रियाही परमार्थमार्गातील संतपदाला पोहोचलेल्या तितक्याच आदरणीय आणि वंदनीय अशा स्त्रिया आहेत. ह्या स्त्री संत मालिकेत संत मुक्ताबाई ही मात्र, सर्वश्रेष्ठ आणि अग्रणी आहे. मुक्ताई ही साक्षात आदिमायेचेच प्रकट रुप होती. इ.स. १२७९ ते १२९७ ह्या कालखंडातील मुक्ताईचे एकूण आयुष्य अवघे १६-१७ वर्षांचेच होते. परंतु, एवढ्या अल्पायुषी आयुष्यातही तिने ज्ञान प्राप्त करून घेतले आणि ती संतपदावर आरुढ झाली. इतक्या लहान वयातली तिची प्रतिभा आणि परमार्थ मार्गातील तिने मिळविलेले ज्ञान आणि उच्चपद हे स्तिमित करणारे आहे.
मुक्ताबाई ही निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान या अलौकिक संतत्रिमूर्तींची तशीच अद्वितीय धाकटी बहीण. भावंडांमध्ये सर्वात लहान. ह्या भावंडांच्या आई-वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला तेव्हा मुक्ताई अवघी तीन-चार वर्षांची होती. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याऱ्या मुक्ताबाईचा आध्यात्मिक अनुभव थोर होता. ज्ञानेश्वरादी भावंडांमधील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिकार यांचे सजीव रूप मुक्ताबाई होय. मुक्ताबाई आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना निर्भयपणे खंबीरपणे सामोरी जाते. विवेक तर मुक्ताबाईत दृढपणे विसावलेला. म्हणून जेव्हा जनसमाजाकडून प्रत्येकवेळी होणारी उपेक्षा व अपमान सहन न होऊन, ज्ञानेश्वर जेव्हा उद्विग्न स्थितीवर मात करावी म्हणून पर्णकुटीची ताटी (दार) बंद करून ध्यानस्थ बसले. त्यावेळी केवळ नऊ वर्षांची लाडीवाळ मुक्ताबाई कर्तव्यदक्ष पित्याची कठोर जबाबदारी आत्मविश्वासाने पेलून आपल्या वत्सल अभंगवाणीने ज्ञानदेवांना उद्देशून योग्याची लक्षणे कथन करते. दु:खी अपमानित ज्ञानदेवांचे ताटीच्या अभंगात सांत्वन करते.
शब्द शस्त्रे झाली क्लेश ! संती मानवा उपदेश !!
विश्वपट ब्रम्हा दोरा ! तटी उघडा ज्ञानेश्वरा !!
ताटीच्या अभंगात मुक्ताबाईचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्ताबाईंनी जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत, ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री क्षेत्र अाळंदी येथे संजिवन समाधी घेतल्यानंतर सोपानकाका सासवडला समाधिस्त झाले. नंतर नेवासा, अापेगांव, पुणतांबे, पैठण, घृणेश्वर, पहुर, जामनेर, बोदवड मार्गे हि संत मंडळी सर्व मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथे अाले असता १५ दिवस मुक्ताईनगर कोथळी परिसरात वास्तव्य करुन वै. वद्य १० ला दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुक्ताई स्व-स्वरुपकार झाल्या. त्याच मुक्ताईच्या पावन भुमीमध्ये मुक्ताई समाधी स्थळ व प्रगट्य स्थान म्हणून भव्य मंदिर अाहे.
सुख सागर अापण व्हावे ! जग बोधे निववावे !!
बोधा करू नये अंतर ! साधु नाही अापपर !!
-भागवत पेटकर
No comments:
Post a Comment