मानवता हीच मानवाची जात : संत रोहिदासा
ऐसा चाहो राज मे, जहाँ मिले सबन को अन्न !
छोट बडो सभ सम बसे, रविदास रहे प्रसन्न !!
संत रोहिदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील काशी (वाराणशी) जवळील मांडूर या गावचा. चर्मकार समाजातील रघुराम व कर्मादेवी या दांम्पत्याच्या घरी १३७३ मध्ये माघ पौर्णिमेस त्यांचा जन्म झाला. या कालखंडात भारतीय समाजव्यवस्थेत जातीयतेने थैमान घातले होतं, प्रचंड भेदभाव होते. अशा सामजिक व्यवस्थेविरुद्ध संत रोहिदासांनी अध्यात्मिक वाणीने धार्मिक सहिष्णुता, सामाजिकता या उद्देशाने जनतेसाठी लढा उभारला. मानवता हाच खरा धर्म त्यांनी समाजासमोर मांडला. म्हणून ते मानवतेचे आद्य पुरस्कर्ते होते. संत रोहिदासांचे विचार आजही भारतीय समाजाच्या विकासासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहेत.
संत रोहिदास लहानपणापासून भक्तीवेडे, त्यामुळे भजन, पूजन तसेच साधुसंतांच्या सेवेत त्यांचा वेळ जात असे. रोहिदासांचा कालखंड म्हणजे प्रचंड समाजिक विषमता, अन्याय, अत्याचार आणि शोषणाचा होता. त्यांनी अध्यात्माव्दारे भारतीय समाज जागृतीचे काम असीम निष्ठेने, अविरत परीश्रम आणि सदाचाराच्या बळावर केले. अध्यात्मिक ज्ञान, सामाजिक विचार, जनसमान्यांपर्यंत पोहचवतानाच त्यांनी समाजाला एकत्रीत आणून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
संत रोहिदासांचे भारतीय समाजव्यवस्थेतील वर्णव्यवस्था व जातीयतेबद्दलचे विचार परखड आणि स्पष्ट होते. ते म्हणतात, भारतीय सामाजिक व्यवस्था केळाच्या झाडासारखी आहे. ज्याप्रमाणे केळाच्या झाडामध्ये पानानंतर पान आणि त्यानंतर पान याप्रकारे शेवटपर्यंत पानेच मिळतात, तशीच स्थिती या समाजव्यवस्थेची आहे. ज्यामध्ये जाती नंतर जात, आणि पुन्हा जात, शेवटपर्यंत जातच दिसते. त्या समाजव्यवस्थेत जातीयतेमुळे बहुसंख्य लोक दु:खी, पीडीत होते. त्या विषयी ते म्हणतात, की सर्व लोक जातीव्यवस्थेच्या चक्रव्यूहात फसलेले आहेत. या जातीच्या रोगाने मानवतेला खाऊन टाकलेले आहे.
संत रोहिदासांचा एकच देव होता. तो म्हणजे निराकार निर्गुण मानवधर्म. मानवता हीच मानवाची जात आहे. या विचाराचे ते पुरस्कर्ते होते. संत रोहिदासांनी संपूर्ण भारतात भ्रमण करून जातीभेद, उच्चनीच भेदभाव, सामाजिक विषमता तसेच वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध जणू समाजिक संघर्षांचा पाया रचला. त्यांनी समाजिक समता, धार्मिक एकता व मानवतेचा पुरस्कार केला. गुरू रोहिदासांनी समाजाला मुक्तीचा संदेश दिला. गुलामगिरीच्या विरोधात विद्रोह करण्याचा संदेश दिला. दुसऱ्यावर अवलंबून राहणे पाप आहे हे पटवून दिले. रोहिदासांनी ६०० वर्षांपूर्वीच अशा राज्याची कल्पना केली होती की, जेथे सर्वाना अन्न मिळेल, सर्व समान राहतील, कोणी उच्चनीच राहणार नाही, ते म्हणतात की,
ऐसा चाहो राज मे, जहाँ मिले सबन को अन्न ।
छोट बडो सभ सम बसे, रविदास रहे प्रसन्न ।।
त्यांना सामाजिक समता हवी होती. ते अशा कल्याणकारी राज्याचे उपासक होते, जेथे सर्वाना न्याय, समता, अन्न, वस्त्र, निवारा, मिळेल व जातपात विरहित सामाजिक समता असेल त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानामुळे भारतभर त्यांचे शिष्यगण तयार झाले. चितोड राज घराण्याची मीराबाई राणी झाली, पीपाजी महाराज व इतर त्यांचे असंख्य शिष्य बनले. संत कबीर आणि गुरू नानक हे रोहिदासांचे समकालीन होते. कबीरांनी गुरू रोहिदासांना मोठे बंधू मानले होते, तर ‘गुरू ग्रंथ साहिबा’ या शिखांच्या धर्मग्रंथात रोहिदासांनी ४० पदे आहेत. संत रोहिदासांनी भारतीय दलित-बहुजन समाजाला संघटीत करण्यासाठी सतत प्रयत्न केले. माझ्या सज्जनांनो, संघटीत व्हा, ज्याप्रमाणे मधमाशा एकत्रित राहतात त्याप्रमाणे संघटीत व्हा, असा उपदेश त्यांनी केला.
संत मीरा चितोड राजघराण्याची राणी होती. परंतु, संत रोहिदासांच्या आध्यात्मिक ज्ञानाने प्रभावित होऊन तिने शिष्यत्व पत्करले होते. संत रोहिदासांना चितोड येथे येण्याचे आमंत्रण दिले होते. संत रोहिदासांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. स्पृश्य-अस्पृश्यतेमुळे ब्राह्मण-पंडितांशी त्यांना वाद विवाद करावे लागले.
संत रोहिदासांचे मानवी मूल्य जपणारे मानवतावादी विचार आजही योग्य व आदर्शवत असून समाजाला प्रेरणा देणारे आहेत. आजही भारतीय विषमतावादी समाज व्यवस्थेला बदलून टाकण्यासाठी पुन्हा संत रोहिदासांच्या मानवतावादी विचारांची पेरणी समाजाच्या सर्व घटकांपर्यंत होणे आवश्यक आहे. भारतीय समाज एकसंघ, वर्गविरहीत करण्यासाठी आध्यात्मिक आणि धार्मिक सहिष्णुतेतून समता व मानवता हाच मानवाचा धर्म या संत रोहिदासांच्या विचारांची मूल्ये भारतीय समाजव्यवस्था सुदृढ करण्यासाठी पोषक ठरणार आहेत. संत रोहिदासांच्या आध्यात्मिक, सामाजिक व मानवतावादी विचारांची दिव्यज्योत महाराष्ट्रातील चर्मकार समाजाने एक दिलाने तेवत ठेवली आहे. माघ पौर्णिमेला संत रोहिदास जयंती साजरी केली जाते.
--------