Saturday, 25 February 2017

जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे : संत तुकाराम

 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेदभ्रम अमंगळ !!
आईका जी तुम्ही भक्त भागवत ! कराल तें हित सत्य करा !! 
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ! वर्म सर्वेश्र्वरपूजनाचें !!
 तुका म्हणे एका देहाचे अवयव ! सुख दु:ख जीव भोग पावे !!

अखंड कीर्तनामुळे काया ब्रह्मभूत झालेले साक्षात्कारी सत्पुरूष, जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे, जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे जगद्गुरू म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतांपैकी एक संतकवी. पुणे जिल्ह्यातील देहू येथे इ. स. १६०८, माघ शु. पंचमीला त्यांचा जन्म झाला. अभंग म्हटला की, तो फक्त तुकोबांचाच अभंग. एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. महाराजांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच. आजही तितकीच लोकप्रियता ‘अभंग’ला आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा ! इतरांनी वहावा भार माथा !! असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ! शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं !! असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचा सार सांगितला. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ! भेदाभेद-भ्रम अमंगळ !! या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली. म्हणून भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले आहे. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते आजही स्थिर आहेत. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे.  महाराजांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती.  पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले.  महाराज १७-१८ वर्षांचे असतांना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. सतत विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत: करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी ! आणिक न करी तीर्थव्रत !! पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते. वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्र्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्ये. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन, कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार, दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका, विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत की, असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात महाराजांनी ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला. आणि सेवटी फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९)  महाराज ब्रह्मलीन झाले.
आम्ही जातो आमुच्या गावा !! आमुचा राम राम घ्यावा !!
सकळही माझी बोळवण करा !! परतोनि घरा जावे तुम्ही !!
वाढवेळ झाला उभा पांडुरंग ! वैकुंठा श्रीरंग बोलावतो !!

आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी ! सकळा सांगावी विनंती माझी !!
अंत:काळी विठो आम्हासी पावला ! कुडीसहित झाला गुप्त तुका !!

                                                                                                          --भागवत पेटकर


Saturday, 18 February 2017

विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार म्हणजे संत बहिणाबाई

विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार म्हणजे संत बहिणाबाई

संत कान्होपात्रेखेरीज विठ्ठलाला संपूर्ण समर्पित झालेली स्त्री संत म्हणजे संत बहिणाबाई. स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान मानावे लागेल. बहिणाबाईंचा जन्म वैजापूर तालुक्‍यातील देवगांव येथे शके १५५१ मध्‍ये ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्‍या आईचे नांव जानकी व पित्‍याचे नांव आऊजी. माता-पित्‍यानी तिचा विवाह वयाच्‍या पाचव्या वर्षी त्याच गावातील पाठक कुटूंबात लावला. संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा, कीतने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरूषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्‍ती कमी होवून परमार्थीक वृत्ती वाढत गेली. घरची गरीबी, शिक्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडूरंगाची ओढ मनात होतीच. शेतात काम करित असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडत होता. पुढे कोल्‍हापूर वास्‍तव्‍यात जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाने संत बहिणाबाईच्‍या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकोबाचे अभंग म्‍हणू लागली व तुकोबाचे दर्शनाचा ध्‍यास घेतला. तिला तुकोबारायाना सदगुरू करून त्‍यांचाकडून अनुग्रह व आर्शिवाद घ्‍यावयाचा होता. म्‍हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत त्‍यांचे ध्‍यान करू लागली. शेवटी कार्तिक व. ५ शके १५६९ रोजी तुकोबारायानी स्‍वप्‍नात येवून गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरूबोधामुळे बदलुन गेले. तिने आपले गुरु संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे.
संत बहिणाबाई यांनी सुमारे ४७३ अभंगांची रचना केली आहे. आणि  शके १७०० मध्ये संत बहिणाबाई समाधिस्थ झाल्या.

संत कृपा झाली इमारत फळा आली !
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया !
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तारिले आवार !
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत !
तुका झालासे कळस भजन करा सावकाश !
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा !!

भागवत पेटकर



Saturday, 11 February 2017

रसाळ वाणीचा झरा : संत गोरोबा

रसाळ वाणीचा झरा : संत गोरोबा 

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशोधडी आपणियाशी ॥
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं, मायबापा ॥

देवांनी सुद्धा भारतभूमीवरच जन्म घेतला. ही देवभूमीच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात.  संत हे चालते फिरते देवच मानले जातात. आपल्या देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. गुरूचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत रोहिदास, संत सावता आणि समर्थ रामदास हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होते. त्यांच्यामुळे आध्यात्मिक समता घडली. माणूस उभा राहिला तरच देश उभारेल, हे जाणून संतांनी जागृतीचे काम केले. त्यातलेच एेक संत गोरा कुंभार.
उस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाउलखुणा आजही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात प्रदेशासी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्रला ज्ञात आहे. या गावात गोरोबाकाकाचे जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी मंदिर आहे. तर येथील कांही मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत. गावाच्या आग्नेय दिशेला श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे. तर गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्ती समोर विष्णूची मूर्ती आहे.
 संत गोरोबा कुंभारांचा जन्म इ.स.१२६७ मध्ये झाला. गोरोबा पेशाने कुंभार होते. संत नामदेव व ज्ञानेश्वरांचे ते समकालीन होते, संत गोराबा हे ज्ञानेश्वर, निवृतीनाथ, मुक्ताबाई, सोपान आदि संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडील होते. त्यामुळे सर्व जण त्यांना गोरोबाकाका म्हणत असत. गोरोबांनी ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव,चोखामेळा, विसोबा खेचर आदि संताची, कोणाचे मडके (डोके) किती पक्के, अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली. त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरूपदेश घ्यावयास सांगितले. तेव्हा संत नामदेवांनी विठोबा खेचरांना आपले गुरू केले. संत गोरोबांची उपलब्ध असलेली काव्यरचना थोडीच आहे. त्यांचे सुमारे २० अभंग सकलसंत गाथेत समाविष्ट आहेत. गोरोबांचे अभंग म्हणजे रसाळ वाणीचा झरा, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे अभंग आहेत. निर्गुणाचा संग धरल्यावर काय अवस्था होते हे त्यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. अस्या महान गोरोबांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (१० एप्रिल १३१७) तेर गावी समाधी घेतली. हे गाव सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यात असून लातूरपासूनही जवळ आहे.
एकत्व पाहतां अवघें लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें, मायबापा ॥
म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा ।
तुम्हा आम्हा ठावा कैसे काय, मायबापा ॥
       
-भागवत पेटकर