Saturday, 28 January 2017

मनालाही संस्कारित राजमार्ग दाखविणारे 'संत रामदास'

मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥

ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, संत जनाबाई, मुक्ताबाई, सोपानदेव यासारख्या अनेक संतांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ असणारा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणूनच ओळखला जातो. या संतांनी भक्ती मार्गाद्वारे समाजात जनजागृती निर्माण केली. संत रामदास स्वामी हेही त्यातलेच एक. रामदास स्वामी यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील जांब नावाच्या गावी झाला. ते बालपणात चांगलेच खोडकर होते. गावातील लोक दररोज त्यांच्याविषयीच्या तक्रारी त्यांच्या आईजवळ घेऊन येत असत. रोजच्या तक्रारींनी त्रासलेल्या त्यांच्या आईने (राणुबाई) नारायणला (बालपणातील नाव) समजावले की, तू दिवसभर फक्त दुसऱ्यांच्या खोड्या काढीत असतोच त्यापेक्षा काही काम करीत जा. गंगाधर (मोठा भाऊ) बघ कुटुंबाची किती काळजी घेतो. या गोष्टीने नारायणच्या मनात घर केले.
दोन-तीन दिवसांनंतर हाच बालक खोडकरपणा सोडून एका खोलीत ध्यानमग्न बसला. दिवसभर नारायण न दिसल्यामुळे आईने मोठ्या मुलाकडे विचारपूस केली असता त्यानेही तो कुठेच दिसला नाही, असे सांगितले. दोघांनीही त्याला शोधावयास सरूवात केली. पण तो कुठेच दिसला नाही. सायंकाळी अचानक आपल्या खोलीत ध्यानस्थ बसलेल्या नारायणाकडे आईचे लक्ष गेले. आईने त्याला काय करीत आहेस? अशी विचारणा केली. तेव्हा नारायणने उत्तर दिले, मी पूर्ण विश्वाची काळजी करीत आहे. या घटनेनंतर नारायणची दिनचर्या पूर्णपणे बदलली. त्यांनी समाजातील तरुण वर्गाला आरोग्य आणि सुदृढ शरीराद्वारेच राष्ट्राची उन्नती शक्य आहे हे समजाविले. व्यायाम करून सुदृढ राहण्याचा सल्ला दिला. शक्तीचा उपासक असलेल्या मारूतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. संपूर्ण भारतात त्यांनी पद-भ्रमण केले. देशात चेतना निर्माण होण्याच्या दृष्ट्रीने त्यांनी जागो-जागी मारूतीची मंदिरे स्थापिली. जागोजागी मठ बांधले. बालपणात त्यांना साक्षात प्रभू रामाचे दर्शन झाले होते. त्यामुळे ते स्वतः:ला रामदास म्हणवून घेत असत. त्यावेळी महाराष्ट्रात शिवाजी राजांचा उदय होत होता. शिवाजी महाराज रामदास स्वामींच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले होते.
समर्थांनी बरेच ग्रंथ लिहिले होते. त्यात 'दासबोध' प्रमुख आहे. 'मनाचे श्लोक' द्वारे त्यांनी मनालाही संस्कारित करण्याचा राजमार्ग दाखविला.

आपल्या जीवनाचा अंतिम काळ त्यांनी साताऱ्याजवळील परळी किल्ल्यावर व्यतीत केला. हा किल्लाच पुढे सज्जनगड नावाने प्रसिद्ध झाला. तेथेच त्यांची समाधी आहे. येथे दासनवमीला दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी समर्थांचे भक्त भारताच्या विविध प्रांतातून दोन आठवड्याचा दौरा काढतात आणि त्यावेळी मिळालेल्या भिक्षेतून सज्जनगडची व्यवस्था चालते.
मना सर्वही संग सोडूनि द्यावा । अती आदरे सज्जनाचा धरावा ॥
जयाचेनि संगे महादुःख भंगे । जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे ॥ 

-भागवत पेटकर

Saturday, 21 January 2017

संत ज्ञानेश्वर : आध्यात्मिक लोकशाहीचे बीज


ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया !
तुका झालासे कळस, भजन करा सावकाश !!


संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ८०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील न प्राणसखा हा समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे. संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव या गावी (इ.स. १२७५) मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई हे भावंड. निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सदगुरूंच्या कृपाशिर्वादाने भगवदगीतेवर त्यांनी टीका लिहिली. या ग्रंथास ज्ञानेश्वरी असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
भूतो न भविष्यति असे अजोड व्यक्तिमत्त्व आणि अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने हे व्यक्तिमत्त्व आपल्या मनात जपले आहे. ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, महान तत्त्वज्ञ, विठ्ठलाचा प्राणसखा अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.
माझा मराठाचि बोलू कौतुके । परि अमृतातेहि पैजासी जिंके । ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।।
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ज्ञानेश्वरी ग्रंथाने भुरळ घातली. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. पसायदान ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ (इ.स. १२१२) मध्ये लिहिला गेला.
त्यांचा दुसरा ग्रंथ अमृतानुभव होय. चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकऱ्यांची त्रिकाल संध्याच आहे. हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, हे हरिपाठ सांगतो. अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माउली म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाडःमय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित केली.
ज्ञानदेवांनी वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली. (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, इ.स.१२९६, वार गुरुवार) हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.
नामा म्हणे आता लोपला दिनकर ! 
बाप ज्ञानेश्‍वर समाधीस्थ !! 


भागवत पेटकर 

Friday, 6 January 2017

संत जनाबाई : तेजस्वी स्त्री शक्तीचा हुंकार म्हणजे जनाई


संत जनाबाई :  तेजस्वी स्त्री शक्तीचा हुंकार म्हणजे जनाई

जनीचे अभंग  लिहीत नारायण ।  करीत श्रवण साधु संत।।
धन्य ते ची जनी, धन्य  तेची भक्ती । नामदेव स्तती करीतसे।।

‘स्त्री संत’ शब्दाचा भावार्थ ध्यानी घेताना काना-मात्रा देताच अक्षरांना पंख फुटतात. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी सुख-दु:ख, मानहानी, प्रतिकूल प्रसंग यांना सामोरं जावं लागतं. संत-महंत त्यातही विशेषत: स्त्री संतांना. त्यातल्या एक संत जनाबाई. जनाबाई या संत कवयित्री म्हणून लोक प्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापासून स्रिया जात्यावर दळण दळताना, कांडतात आजही ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईचे गाव. जनाबाई ह्या पंढरपूरचे वारकरी ‘दमा’ आणि भगवद्भक्त स्त्री ‘करुंड’ या भक्ताच्या पोटी जनाबाईचा जन्म झाला. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. तिच्या वडिलांनी जनाबाईंन दामाशेटी  शिपीं यांच्या पदरात टाकल. तेव्हापासून त्या संत  शिरोमणी नामदेव महाराज यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईनीही  विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होत. श्री संत ज्ञानदेव- विसोबा खेचर- संत नामदेव- संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे.
विठू माझा लेकुरवाळा ! संगे गोपाळांचा मेळा ! हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. परलोकीचे तारू ! म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु ! असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. घरातील इतर कामे करत असतांना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत.
संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, सहनशीलता, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.
माझा लोभ नाहीं देवा । तुझी करीं ना मी सेवा ! नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ! 
ज्ञानाई आई । आर्त तुझे पायी । धावुनिया येई । दुडदुडू।।
स्त्री संतांच्या मांदीयाळीत जनाईचं असं अनेक पदरी नात्यांनी गुंफलेलं आगळंवेगळं स्थान आहे. जनसामान्य दासी जनीची स्त्री संत मालेतील एक असाधारण व्यक्तित्वाची संत जनाबाई एक संत कवियित्री म्हणूनही नावाजली गेल्यानं वारकरी संप्रदायातही तिचं अभंगस्थान आहे. निरंतर तेवणारी अक्षयज्योत म्हणजे तिची आत्मसाक्षात्कारी अभंगवाणी. जनसामान्यांची प्रतिनिधी, तेजस्वी स्त्री शक्तीचा हुंकार म्हणजे जनाई. संत जनाबाई समस्त स्त्री जातीला बजावणारी. ''स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास''  तिचे हे भावस्वर प्रत्येक स्त्रीला उदंड ऊर्जा देत सकारात्मकतेची, चैतन्याचे स्फूलिंग स्त्री हृदयात चेतवत ठेवेल. त्यासाठी त्या स्वरवेधाची मनाला आस हवी.