Wednesday, 23 November 2016

‘याची देही याची डोळा, भोगु मुक्तीचा सोहळा’

 ‘याची देही याची डोळा, भोगु मुक्तीचा सोहळा’

 संत ज्ञानेश्‍वर महाराज संजिवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी तीन दिवसांपासूनच आळंदीत दाखल झाले आहेत. ठिक- ठिकाणी संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त हरिणाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री  विठ्ठल बाबा देशमुख वारकरी शिक्षण संस्थेत रविवार (ता.२०)पासून सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी काकडा, दुपारी संगित भजन, सायंकाळी हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरि किर्तन होणार आहे. यात गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत, नारायन महाराज जाधव, गुरू निवृत्ती महाराज वक्ते, माऊली महाराज कदम, मनिषानंद महाराज पुरी(मानवतकर), जगन्नाथ महाराज पाटील, विनोदाचार्य, बाबासाहेब महाराज इंगळे(बिड), विवेकानंद महाराज मिसाळ, जयवंत महाराज बोधले(नाशिक), पुंडलिक महाराज शास्री(नगर) आदिंचे हरि किर्तन होणार आहेत. रविवारी (ता.२७) रोजी विठ्ठल बाबा महाराज यांचे शिष्य श्री श्रीनिवास महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहची सांगता होणार असल्याचे सोपान महाराज सानप शास्री हिंगोलीकर, श्रीनिवास महाराज घुगे यांनी सांगितले. दरम्यान, प्रदक्षिणा मार्गासह इंद्रायणीचे दोन्ही घाट गर्दीने फुलून गेले आहेत. रात्रंदिन चालणारा टाळ-मृदंगाचा गजर आणि माउली नामाचा अखंड जयघोष यामुळे अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन गेली आहे. घराण्यात परंपरेने चालत आलेली वारी माऊलीचरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा मेळा आळंदीत जमला आहे. टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा माउली- तुकाराम’चा अखंड जयघोष कानी पडत आहे. गोपाळपुरा, प्रदक्षिणा रस्ता, इंद्रायणी घाट गर्दीने फुलून गेला असून भल्या पहाटे इंद्रायणीवर स्नानासाठी गर्दी जमली होती. इंद्रायणीला मुबलक पाणी असल्याने भाविकांची चांगली सोय झाली आहे. स्नानानंतर भाविकांची पावले माउलींच्या समाधी दर्शनासाठी वळत होती. सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी राहुट्यांमधून वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण इंद्रायणीकाठचा परिसर गजबजून गेला असून वारकऱ्यांचे खेळ रंगले आहे. घाटावर विविध दिंड्या भजन, भारूड, माउलींचा जयघोष करीत होत्या. भक्तिरसात तल्लीन झालेले महिला, पुरुष वारकरी आनंदाने हातात हात घेत फुगड्या खेळत आहेत. पुंडलिक मंदिर परिसरही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. शहरात ठिकठिकाणी अन्नदान, चहावाटप करण्यात येत आहे. ‘याची देही याची डोळा, भोगु मुक्तीचा सोहळा’ अनुभवण्यासाठी वारकरी आळंदीत दाखल झाला आहेत. 

No comments:

Post a Comment