Sunday, 27 November 2016

नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ..!

नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ..!


संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६,वार, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. श्री क्षेत्र आळंदीतील कार्य संपविल्यानंतर माउलींना तिर्थयात्रा करूशी वाटली. तेव्हा त्यांना आपल्याबरोबर संत नामदेव महाराज असावो म्हणून त्यांना घेण्याकरत माउली पंढरपूरला गेले.
कैलासाचा वास अधिक सिद्धबेट, विष्णूचें वैकूंठ पुरातन!
या ठिकाणी ज्ञानदेवांनी १०८ वेळा समाधी घेतली आहे. असे हे स्थळ सकळ सिद्ध आणि अनादि आहे.
यानुसार, सर्व संतमंडळी दिंड्या पताका घेउन खिन्न मनाने खेद करत अलंकापूरीत निघाले.निवृत्तीनाथ महाराज पण त्यांचाही कंठ दाटून आला. सोपान, मुक्ता, यांना तर रडूच कोसळले, नामदेव महाराजांच्या शोकास तर पारावारच राहिला नाही. त्याचप्रमाणे नारा, विठा, गोंदा, महादा आदीकरून संत मंडळींना फार वाईट वाटले. व ते खेद करत सर्व इंद्रायणीच्या तीरी आले. त्यात सर्वात पुढे नारा विठा चालत होते.अशा प्रकारे सर्व भक्तमंडळी सौदंडीच्या झाडाखाली बसले. माउली आता समाधी घेणार म्हणून सर्वांनाच खेद वाटत होता. यानंतर सर्व संत मंडळी सौदंडीच्या झाडाखालून उठून जुनाट असे पवित्र शिवपीठ येथे आले.
अशा तऱ्हेने एकीकडे माउलींच्या समाधिची तयारी होत होती तर दुसरीकडे उपस्थीतांचे कंठ दाटून येत होते. पाण्यातील मासा ज्याप्रमाणे  पाण्याविना तळमळतो त्याप्रमाणे माउली आपल्यात यापुढे नाहित. या भावनेने समस्त उपस्थित जनसमुदायाचे हृदय हेलावून गेले. प्रत्येकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावू लागल्या. त्यावेळी स्वता माऊली उपस्थितांना म्हणाले, तुम्ही जर असे करू लागले तर समाधिला उशिर होईल.
आठवाल फार, लागे उशिर समाधीसी.!!
असे म्हणून त्यांननी सिद्धेश्वरा समोरिल नंदी बाजूला सारून पूर्वीचे समाधीचे जुनाट स्थान दाखविले.
अष्टोतरशे वेळ समाधि निश्चळ, पूर्वी तुझे वहनाखाली!
नामदेव महाराज म्हणतात, हे जुनाट स्थान माउलींनी आम्हाला दाखविले हे पाहून नारा विठा गोंदा महादा यांना समाधिची जागा स्वच्छ करावयास सांगितली. नंतर हे सर्व संत मंडळी वर आली. या वेळी माउलींची सर्वांनी शोडषोपचारे पूजा केली व कंठ वाटून येउन सर्वांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर आले. नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितले की, तुम्ही सर्वजण भेटा माउली समाधिकडे जात आहेत. सर्व भेटल्यानंतर निवृत्तीनाथ व भगवंतनाने एका एका हाताला धरून माउलींना समाधी स्थानावर वसविण्याकरता चालले. ज्ञानदेव आता आसनावर जावून बसले व भक्त मंडळींनी त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. नंतर भगवंताने ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात ठेवला नंतर दर्शन घेतले. त्यावर देव पुढे म्हणाले, हे पहा जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत. माउलींची समाधी तोपर्यंत स्थिर राहिल.
देव म्हणे ज्ञानेश्वरा.चंद्र तारा जव दिनकरा!
तव तुम्ही समाधि स्थिरा,राहे तारा हे निरंतर !!
त्यावेळी त्यांची अवस्था काय झाली हे वर्णन करणे कठिण आहे.अशा परिस्थितीतही भगवंतांनी सर्वांना कठिण अंतकरणाने बाहेर आणले व त्यास शिळा बसविली. माउलींनी समाधी घेतल्यानंतर या भक्त मंडळींनी काय अवस्था झाली हे नामदेव महाराज वर्णन करतात.
वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, आणिकाच्या डोळा अश्रु येती!!
अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरूपण सिद्धी नेले!!
भगवंताने देखील आपले मन पुष्कळ आवरले पण नाईलाज झाला.भगवंताच्या डोळ्याला देखिल अश्रु आले. त्यावेळी रखुमाई म्हणाल्या हो आतापर्यंत पुष्कळसे गेले त्याबद्दल खेद केला नाही. कित्येक जन्माला आलेत त्याबद्दल आनंदही नाही. देव रूक्मिणीला म्हणतात की, रूक्मिणी मी हा एक योगी डोळ्याने पाहिला आहे आणि त्रैलोक्याचे हेच एक जीवन आहे.
देवो म्हणीती रूक्मिणी, हा येचि युगी देखील नयनी!
हेचि ज्ञान संजिवनी,जाण त्रिलोक्यासी!!
भगवंत आतापर्यंत कोणाकरिताही रडले नाही परंतु माउलींच्या समाधिचे वेळी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. तेवढ्यात नामदेव  महाराज पुढे आले व भगवंताला म्हणाले माउली सोडून गेले त्यासाठी माझा जीव कासावीस होत आहे. भगवंत नामदेवांची सजूत घालू लागले. असे नामदेवा रडू नकोस ते कोण होते त्याची तुला कल्पना नाही. अशाप्रकारे सर्वच मंडळी शोक करत होते. एवढ्यात भगवंताने सांगितले, आता आपणास पंढरपूरला जावयाचे आहे. असे म्हटल्यावर सर्वांनी कठिण अंतकरणाने ज्ञानदेवांच्या समाधिला प्रदक्षिणा घातली व सर्वांनी नमस्कार केला. सर्व मंडळी बाहेर पडले माउलींच्या नावाचा जयजयकार केला.
इंद्रायणी काठी देवाची आळंदी ! लागली समाधी ज्ञानेशाची !

Friday, 25 November 2016

इंद्रायणी काठी देवाची आळंदी ! लागली समाधी ज्ञानेशाची !


 इंद्रायणी काठी देवाची आळंदी ! लागली समाधी ज्ञानेशाची !

ज्ञानियाचा राजा भोगतो जाणीव, नाचती वैष्णव मागे पुढे मागे पुढे ॥
मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे ॥
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६,वार, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.
श्री क्षेत्र आळंदीतील कार्य संपविल्यानंतर माउलींना तिर्थयात्रा करूशी वाटली.तेव्हा त्यांना आपल्याबरोबर संत नामदेव महाराज असावो म्हणून त्यांना घेण्याकरत माउली पंढरपूरला गेले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले-नामदेव महाराज, भगवंताच्या आज्ञेनुसार, नामदेव महाराज तिर्थयात्रा करण्यासाठी निघाले.ते आपली आत्मचर्चा करीत सर्व तिर्थक्षेत्रे पाहिली नंतर पंढरपूरला  परत आले.
तीर्थे करोनी नामा पंढरीये आला, जिवलगा भेटला विठोबासी !
सदगदीत कंठ वोसंडला नयनी, घातला लोळणी चरणावरी !!
नामदेव महाराज पंढरपूरला आल्यानंतर संत नामदेवांनी पंढरीच्या विठूराया चरणी आपले मस्तक ठेवले. आपला जिवलग आपल्याला भेटला या भावनेने त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले एवढी परमभक्ती इश्वरावर संत नामदेवांची होती.त्यानंतर संत नामदेवांनी माउलींसाठी मोठ्या थाटा माटात मावंदे घातले.त्यानंतर माउलींनी आपले इहलोकीचे कार्य संपले असून त्यांना पांडूरंग चरणी मिठी मारून पांडूरंगाला म्हणाले, मी आपली परवानगी घ्यायला आलो. मला तुमच्या चरणाजवळ समाधी घ्यावयाची आहे.
ज्ञानदेवो म्हणे  विठ्ठलाशी, समाधान तुंचि होसी !   परि समाधि हे तुजपासी, घेईन देवो !
संत नामदेव महाराज तेव्हा ज्ञानदेवांचे हे वचन ऐकून भगवंत म्हणाले, ज्ञानदेवा येथे तुम्हाला समाधी घेता येणार नाही, तर तुम्हाला पुण्यवचन असणारी  जी अलंकापूरी आहे तेथेच समाधी घ्यावी लागेल. अशा प्रकारे संत ज्ञानदेवांना भगवंतांकडून वचन मिळाले त्याचे नामदेवांनी खालिलप्रमाणे वर्णन केले.
कैलासाचा वास अधिक सिद्धबेट, विष्णूचें वैकूंठ पुरातन,
देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि, येथेच समाधी ज्ञानदेवा,
या ठिकाणी ज्ञानदेवांनी १०८ वेळा समाधी घेतली आहे. असे हे स्थळ सकळ सिद्ध आणि अनादि आहे.
धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधि स्थिरा,
कृष्णपक्षी तुज निर्धारा, भेट देत जाईन !
कार्तिक मास शुद्ध एकादशी, पंढरीयात्रा होईल सरिशी !
यानुसार, सर्व संतमंडळी दिंड्या पताका घेउन खिन्न मनाने खेद करत अलंकापूरीत निघाले.
निवृत्तीनाथ महाराज पण त्यांचाही कंठ दाटून आला.सोपान, मुक्ता, यांना तर रडूच कोसळले,नामदेव महाराजांच्या शोकास तर पारावारच राहिला नाही. त्याचप्रमाणे नारा, विठा, गोंदा, महादा आदीकरून संत मंडळींना फार वाईट वाटले. व ते खेद करत सर्व इंद्रायणीच्या तीरी आले.त्यात सर्वात पुढे नारा विठा चालत होते. मग
सकळही भक्त मेळी  सहित वनमाळी, बैसले तये पाळी  इंद्रायणीचे,
नारा विठा पुढे चाले, ऐसे इंद्रायणीस आले, सौदंडीवृक्षातळी बैसले,
अशा प्रकारे सर्व भक्तमंडळी सौदंडीच्या झाडाखाली बसले.माउली आता समाधी घेणार म्हणून सर्वांनाच खेद वाटत होता.नामदेव महाराजा विषयी तर बोलायलाच नको.
यानंतर सर्व संत मंडळी सौदंडीच्या झाडाखालून उठून जुनाट असे पवित्र शिवपीठ येथे आले व नारा विठा गोंदा महादा यांना तुळशी  बेल फुले भागिरथीचे पवित्र पाणी आणण्यास सांगितले.
नारा विठा गोंदा पाठविला महादा, साहित्य गोविंदा सांगितले,
तुळशी आणि बेल दर्भ आणि फुले,
उदक हे चांगले भागिरथीचे... कासाविस प्राण मन तळमळी,
जैसी का मासोळी जीवनाविण....!
अशा त-हेने एकीकडे माउलींच्या समाधिची तयारी होत होती तर दुसरीकडे उपस्थीतांचं कंठ दाटून येत होते.पाण्यातील मासा ज्याप्रमाणे  पाण्याविना तळमळतो त्याप्रमाणे माउली आपल्यात यापुढे नाहित या भावनेने समस्त उपस्थित जनसमुदायाचे हृदय हेलावून गेले प्रत्येकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावू लागल्या.त्यावेळी स्वता माउली उपस्थीतांना म्हणाले,तुम्ही जर असे करू लागले तर समाधिला उशिर होईल. देव म्हणे असे
आठवाल फार,लागे उशिर समाधीसी...
असे म्हणून त्यांननी सिद्धेश्वरा समोरिल नंदी बाजूला सारून पूर्वीचे समाधीचे जुनाट स्थान दाखविले.
अष्टोतरशे वेळ समाधि निश्चळ, पूर्वी तुझे वहनाखाली,
उठविला नंदी पाहिली जुनाट, उघडिली शिळा विवराची,
बा माझी समाधि पहिली जुनाट, केवळ वैकुंठ गुह्यगोप्य,
नामा म्हणे देवा पुरातन स्थान,ऐसे नारायणे दावियेले....
नामदेव महाराज म्हणतात,हे जुनाट स्थान माउलींनी आम्हाला दाखविले हे पाहून नारा विठा गोंदा महादा यांना समाधिची जागा स्वच्छ करावयास सांगितली.
नारा विठा गोंदा महादा पाठविला, झाडविली जागा समाधिची...
नंतर हे सर्व वर आले यावेळी माउलींची सर्वांनी शोडषोपचारे पूजा केली व कंठ वाटून येउन सर्वांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर आले.
पूर्वी अनंत भक्त जाले,पुढे ही भविष्य बोलिले, परि निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले,
अपार जीवजंतु, नामा म्हणे भेटा लहान थोर सारे, जातो ज्ञानेश्वर समाधिसी..
 नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वजण भेटा माउली समाधिकडे जात आहेत.सर्व भेटल्यानंतर निवृत्तीनाथ व भगवंतनाने  एका एका हाताला धरून माउलींना समाधि स्थानावर वसविण्याकरता चालले.
देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधिसी..
ज्ञानदेव आता आसनावर जावून बसले व भक्त मंडळींनी त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली.नंतर भगवंताने ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात  ठेवला नंतर दर्शन घेतले.त्यावर देव पुढे म्हणाले हे पहा जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत माउलींची समाधि तोपर्यंत स्थिर राहिल.
जाउनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरि,  पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली,
हस्त ठेविला माथया, ज्ञानदेव लागे पाया,
माउलींनी तिन वेळेस आता नमस्कार करून डोळे झाकले. त्यावेळी त्यांची अवस्था काय झाली हे वर्णन करणे कठिण.अशा परिस्थितीतही भगवंतांनी सर्वांना कठिण अंतकरणाने बाहेर आणले व त्यास शिळा बसविली.
तीन वेळा जेव्हा जोडिले करकमळ, झाकियेले डोळे ज्ञानदेवे,
नामा म्हणे आता लोपला दिनकर ,बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ...
माउलींनी समाधी घेतल्यानंतर या भक्त मंडळींनी काय अवस्था झाली हे नामदेव महाराज वर्णन करतात.जे प्रवृत्तीवर कधी न येणारे  असे निवृत्तीनाथ महाराज यांचीअवस्था काय झाली.
वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, आणिकाच्या डोळा अश्रु येती,
 भगवंताने देखील आपले मन पुष्कळ आवरले पण नाईलाज झाला.भगवंताच्या डोळ्याला देखिल अश्रु आले.त्यावेळी रखुमाई म्हणाल्या हो आतापर्यंत पुष्कळसे गेले त्याबद्दल खेद केला नाही.कित्येक जन्माला आलेत त्याबद्दल आनंदही नाही. तर आज हे काय त्यावेळेसे  देव रूक्मिणीला म्हणतात की रूक्मिणी मी हा एक योगी डोळ्याने पाहिला आहे आणि त्रैलोक्याचे हेच एक जीवन आहे.
देवो म्हणीती रूक्मिणी, हा येचि युगी देखील नयनी,
हेचि ज्ञान संजिवनी,जाण त्रिलोक्यासी.
भगवंत आता पर्यंत कोणाकरिताही रडले नाही परंतु माउलींच्या समाधिचे वेळी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.तेवढ्यात नामदेव  महाराज पुढे आले व भगवंताला म्हणाले माउली सोडून गेले त्यासाठी माझा जीव कासावीस होत आहे.
मग प्रश्न आदरिला, नामा स्फुदो जो लागला,
कागा ज़ानदेवी गेला, मज सांडोनिया.
 भगवंत नामदेवांची सजूत घालू लागले. असे नामदेवा रडू नकोस ते कोण होते त्याची तुला कल्पना नाही.
ज्ञानदेव ज्ञान सागरू, ज्ञानदेव ज्ञान गूरू, ज्ञानदेव भवसिंधु तारू, प्रत्यक्ष रूपे असे...
अशाप्रकारे सर्वच मंडळी शोक करत होते. एवढ्यात भगवंताने सांगितले आता आपणास पंढरपूरला जावयाचे आहे असे म्हटल्यावर  सर्वांनी कठिण अंतकरणाने ज्ञानदेवांच्या समाधिला प्रदक्षिणा घातली व सर्वांनी नमस्कार केला. सह मंडळी सारे उठले ऋषिश्वर,केला नमस्कार समाधिशी...
सर्व मंडळी बाहेर पडले माउलींच्या नावाचा जयजयकार केला.
 वैष्णवांचे भार निघाले बाहेर, केला जयजयकार सर्वांनी.
नामा म्हणे आता लोपला दिनकर ,बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ...!


Wednesday, 23 November 2016

‘याची देही याची डोळा, भोगु मुक्तीचा सोहळा’

 ‘याची देही याची डोळा, भोगु मुक्तीचा सोहळा’

 संत ज्ञानेश्‍वर महाराज संजिवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी तीन दिवसांपासूनच आळंदीत दाखल झाले आहेत. ठिक- ठिकाणी संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त हरिणाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री  विठ्ठल बाबा देशमुख वारकरी शिक्षण संस्थेत रविवार (ता.२०)पासून सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी काकडा, दुपारी संगित भजन, सायंकाळी हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरि किर्तन होणार आहे. यात गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत, नारायन महाराज जाधव, गुरू निवृत्ती महाराज वक्ते, माऊली महाराज कदम, मनिषानंद महाराज पुरी(मानवतकर), जगन्नाथ महाराज पाटील, विनोदाचार्य, बाबासाहेब महाराज इंगळे(बिड), विवेकानंद महाराज मिसाळ, जयवंत महाराज बोधले(नाशिक), पुंडलिक महाराज शास्री(नगर) आदिंचे हरि किर्तन होणार आहेत. रविवारी (ता.२७) रोजी विठ्ठल बाबा महाराज यांचे शिष्य श्री श्रीनिवास महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहची सांगता होणार असल्याचे सोपान महाराज सानप शास्री हिंगोलीकर, श्रीनिवास महाराज घुगे यांनी सांगितले. दरम्यान, प्रदक्षिणा मार्गासह इंद्रायणीचे दोन्ही घाट गर्दीने फुलून गेले आहेत. रात्रंदिन चालणारा टाळ-मृदंगाचा गजर आणि माउली नामाचा अखंड जयघोष यामुळे अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन गेली आहे. घराण्यात परंपरेने चालत आलेली वारी माऊलीचरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा मेळा आळंदीत जमला आहे. टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा माउली- तुकाराम’चा अखंड जयघोष कानी पडत आहे. गोपाळपुरा, प्रदक्षिणा रस्ता, इंद्रायणी घाट गर्दीने फुलून गेला असून भल्या पहाटे इंद्रायणीवर स्नानासाठी गर्दी जमली होती. इंद्रायणीला मुबलक पाणी असल्याने भाविकांची चांगली सोय झाली आहे. स्नानानंतर भाविकांची पावले माउलींच्या समाधी दर्शनासाठी वळत होती. सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी राहुट्यांमधून वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण इंद्रायणीकाठचा परिसर गजबजून गेला असून वारकऱ्यांचे खेळ रंगले आहे. घाटावर विविध दिंड्या भजन, भारूड, माउलींचा जयघोष करीत होत्या. भक्तिरसात तल्लीन झालेले महिला, पुरुष वारकरी आनंदाने हातात हात घेत फुगड्या खेळत आहेत. पुंडलिक मंदिर परिसरही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. शहरात ठिकठिकाणी अन्नदान, चहावाटप करण्यात येत आहे. ‘याची देही याची डोळा, भोगु मुक्तीचा सोहळा’ अनुभवण्यासाठी वारकरी आळंदीत दाखल झाला आहेत. 

जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥

जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥ 

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2017



ज्ञानेश्वर,ज्ञानेश्वर,ज्ञानेश्वर,ज्ञानेश्वर।
सुखी म्हणता चुकतील फेरे ॥
जन्म नाही रे आणखी । तुका म्हणे माझी भाक ॥

संत ज्ञानेश्वर मगाराड यांचा जन्म : इ.स. १२७५  आणि  समाधी : इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ म्हणुन आजही  माऊलींची ख्याती आहे. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभाव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना आहे. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव (आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ) येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी  झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुऊंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.

संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म - वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी  मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह सबंद्ध महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने माऊलींच्या दर्शमासाठी अनुयायी दर्शनासाठी आळंदीत येतात. भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे.

निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले. माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० (शके १२१२)मध्ये लिहिला गेला आहे. त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.

‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे

‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित  केली. व त्या समानतेच्य़ा मार्गाने जाण्याचा संदेश तुम्हा- आम्हाला दिला. तोच संदेश आज आपन आंगिकारणे गरजेचे आहे. तरच हा देश, हा महाराष्ट्र सुखी समाधानी लाहील यात शंका नाही...