Thursday, 8 January 2015

संत संगतीचे महत्‍व

संत संगतीचे महत्‍व
एक दिवस नारद महर्षी संतसंगतीचे महत्‍व जाणून घेण्‍यासाठी भगवान श्रीकृष्‍णाकडे जातात व देवाला विनंती करतात की,देवा मला सतसंगतीचे महत्‍व सांगा.तेंव्‍हा देव सांगतात,नारदा तुला संतसंगतीचे महत्‍व जाणून घ्‍यायचे असेल तर मी सांगतो त्‍या प्रमाणे कर.एका कुंपणावरती एक सरडा आहे.तु त्‍याच्‍याकडे जा आणि त्‍याला संतसंगतीचे महत्‍व विचार.नारद महर्षी त्‍या सरड्याकडे येतात व हात जोडून त्‍या सरडयाला विनंती करतात की,मला संतसंगतीचे महत्‍व सांगा.जेव्‍ह सरडयाची आणि नारदाची नजरानजर होते तेव्‍हा तो सरडा मरुन खाली पडतो.
नारदमुनी परत देवाकडे जातात व झालेला प्रकार सांगतात.तेव्‍हा देव सांगतो,त्‍या पिंपळाच्‍या वृक्षावरती एक पोपट आहे.त्‍याला तु संतसंगतीचे महत्‍व विचार.देवाने सांगितल्‍या प्रमाणे नारद परत त्‍या वृक्षाजवळ येवून पोपटाला विनंती करतात की,मला संतसंगतीचे महत्‍व सांगा.परंतु जेव्‍हा नारदाची आणि पोपटाची नजरानजर होते तेंव्हा तो पोपट मरुन नारदाच्‍या पायाजवळ पडतो.तेव्‍हा नारद परत देवाकडे जातात व झालेला प्रकार कथन करतात.तेव्‍हा देव सांगतात की,राजाला मुलगा झालेला आहे,त्‍याकडे जाऊन त्‍याला सतसंगतीचे महत्‍व विचार.
नारद देवाला म्‍हणला,देवा तुच का सांगत नाहीस,तेव्‍हा देव सांगतात,की तु जा तर खरं। देवाच्‍या भिडेखातर नारद तेथून निघतात व राजवाडयात जाताना मनात विचार करतात की,आतापर्यंत जे झालं त्‍याचं कुणीही विचारायला नव्‍हतं परंतु आता जर असं काही झालं तर आपली काही बरी गत होणार नाही.अशा घाबरलेल्‍या परिस्थितीत नारद राजमहालात येतात.नारद राजमहालात आलेले पाहुन राजा त्‍यांचे योग्‍य ते आदरातिथ्‍य करतो.क्षेमकुशल विचारतो.काय निमित्‍तानं येणं केल। असा प्रश्‍न विचारतो.
नारद मनात अत्‍यंत भयभीत असतात.परंतु तसे न दाखवता आपल्‍याला मुलगा झाल्‍याचं कळलं म्‍हणून भेटायला आलो असे सांगतात.त्‍या छोटया मुलाला नारदाकडे आणण्‍याची व्‍यवस्‍था करतात व आणून ते नारदाच्‍या मांडीवर देतात.नारद भितीने घाबरुन गेलेले असतात,परंतु धैर्य करुन त्‍या छोटया मुलाला संतसंगतीचे महत्‍व विचारतात आणि काय आश्‍चर्य त्‍या छोटया मुलाला वाचा फुटते आणि तो मुलगा नारदांना सांगू लागतो,महाराज संतसंगतीचे महत्‍व काय सांगावं.आपण पहिल्‍यांदा मला भेटलात तेंव्‍हा मी सरडयाच्‍या योनीत होतो.आपल्‍या अल्‍प संगतीने मी तत्‍काळ मुक्‍त झालो.मला पोपटाचा जन्‍म मिळाला.तेथेही आपल्‍या अल्‍पशा संगतीने मला मुक्‍ती मिळून मी हया ठिकाणी राजवाडयात जन्‍माला आलो आहे.हा अल्‍पशा संतसंगतीचा परीपाक आहे.
सिध्‍दांत : संत संगतीचे महत्‍व शब्‍दातीत वर्णनातील आहे.ते शब्‍दांनी किंवा वाचेने सांगता येण्‍यासारखे नाही.कारण संतसंगतीचे महत्‍व प्रत्‍यक्ष देवालाही सांगता येत नाही.म्‍हणून देवदेखील संतसंगतीची इच्‍छा करतो.
प्रमाण : १} देव इच्‍छी रज चरणांची माती । धावत चालती मागे मागे ॥ संत तु.
२} अर्धक्षण घडता संतांची संगती । तणे होय शांती महत्‍पापा ॥ संत तुकाराम
३} संत संगती वेगळे । तात्‍काळ पावावया माझे स्‍थान ।
आणिक नाहीच साधन॥ हे सत्‍य जाण उध्‍दवा ॥ भागवत ॥

No comments:

Post a Comment