Saturday, 17 January 2015

श्रीमद् भागवत महापुराण स्कंध ४ था - अध्याय २१ वा

 श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय २१ वा
महाराज पृथूंचा आपल्या प्रजेला उपदेश - मैत्रेय म्हणतात - त्यावेळी महाराज पृथूंचे नगर सगळीकडे मोत्यांचे हार, फुलांच्या माळा, रंगी-बेरंगी वस्त्रे, सोन्याचे दरवाजे आणि अत्यंत सुगंधित धूपांनी सुगंधित झाले होते. त्यातील गल्ल्या, चौक, आणि सडका, चंदन आणि केशरयुक्त सुगंधित पाण्याने सिंचन केलेल्या होत्या. तसेच त्या फुले, अक्षता, फळे, यवांकुर, साळीच्या लाह्या आणि दिवे अशा मांगलिक वस्तूंनी सजविल्या होत्या. तेथे चौका-चौकांत लावलेले फळे-फुले यांच्या गुच्छांनी युक्त केळीचे खांब आणि सुपारीच्या झाडांनी ते नगर फारच मनोहर दिसत होते. तसेच सगळीकडे आंब्याच्या तोरणांनी ते विभूषित केले होते. जेव्हा महाराजांनी नगरात प्रवेश केला, तेव्हा दिवे, भेटवस्तू आणि अनेक प्रकारची मांगलिक सामग्री घेऊन आलेले प्रजाजन तसेच कुंडलांनी सुशोभित सुंदर कन्या त्यांना सामोर्‍या आल्या. शंख, दुंदुभी इत्यादी वाद्ये वाजू लागली. ऋत्विज वेदघोष करू लागले, बंदीजनांनी स्तुती आरंभिली. हे सर्व पाहून आणि ऐकूनसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण झाला नाही. अशा प्रकारे वीरवर पृथूंनी राजमहालात प्रवेश केला. वाटेमध्ये सगळीकडे नगरवासी आणि देशवासीयांनी त्यांचे अभिनंदन केले. परम यशस्वी महाराजांनीसुद्धा त्यांना प्रसन्नतापूर्वक इच्छित वर देऊन संतुष्ट केले. महाराज पृथू महापुरुषांना आणि सर्वांना पूजनीय होते. त्यांनी अशा प्रकारची अनेक औदार्याची कर्मे करीत पृथ्वीचे राज्य केले आणि शेवटी आपल्या विपुल यशाचा विस्तार करून भगवंतांचे परमपदही प्राप्त करून घेतले. (१-७)
सूत म्हणतात - शौनका ! अशा प्रकारे मैत्रेयांच्या तोंडून पृथूचे अनेक प्रकारच्या गुणांनी संपन्न आणि गुणवानांनी प्रशंसा केलेले विस्तृत सुयश ऐकून परम भागवत विदुराने त्यांची प्रशंसा करीत म्हटले. (८)
विदुर म्हणाला - ब्रह्मन, ब्राह्मणांनी पृथूला राज्याभिषेक केला. समस्त देवांनी भेटवस्तू दिल्या. त्यांनी आपल्या बाहूंमध्ये वैष्णव तेज धारण करून त्या बाहूंनी पृथ्वीचे दोहन केले. त्यांच्या त्या पराक्रमामुळे मिळालेल्या विषयभोगांद्वारेच आजही सर्व राजे तसेच लोकपालांसह समस्त लोक स्वतःच्या इच्छेनुसार जीवननिर्वाह करीत आहेत. असा कोण शहाणा असेल की, जो त्यांची पवित्र कीर्ती ऐकू इच्छित नाही ? म्हणून आता आपण मला त्यांचे आणखी पवित्र चरित्र ऐकवावे. (९-१०)
मैत्रेय म्हणाले - महाराज पृथू गंगा आणि यमुनेच्या मध्यवर्ती देशात निवास करून आपल्या पुण्यकर्मांचा क्षय करण्यासाठी प्रारब्धानुसार प्राप्त झालेले भोगच भोगीत होते. ब्राह्मणवंश आणि भगवंतांशी संबंधित विष्णुभक्तांना सोडून त्यांचे सात द्वीपांमधील सर्व पुरुषांवर अखंड आणि अबाधित शासन होते. एकदा त्यांनी एका महायज्ञाची दीक्षा घेतली. त्यावेळी तेथे देव, ब्रह्मर्षी आणि राजर्षींचा फार मोठा समाज एकत्र आला होता. त्या समाजात महाराज पृथूंनी त्या पूजनीय अतिथींचा यथायोग्य सत्कार केला आणि नंतर त्या सभेत नक्षत्रमंडलात चंद्र असावा, त्याप्रमाणे ते उभे राहिले. त्यांची शरीरयष्टी उंच, बाहू पुष्ट आणि लांब, रंग गोरा, नेत्र कमलाप्रमाणे अरुणवर्णाचे, नाक तरतरीत, मुख मनोहर, स्वरूप सौ‌म्य, खांदे उंच आणि हास्ययुक्त सुंदर दंतपंक्ती शोभत होत्या. त्यांची छाती रुंद, कमरेचा पाठीमागील भाग पुष्ट आणि पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे सुडौल असून वळ्यांमुळे आणखीच सुंदर दिसत होते. नाभी भोवर्‍याप्रमाणे गंभीर होती, शरीर तेजस्वी होते. जांघा सोन्याप्रमाणे दैदीप्यमान होत्या. तसेच पायांची ठेवण उभार होती. त्यांचे मस्तकावरील केस बारीक, कुरळे, काळे आणि सुंदर होते. मान शंखाप्रमाणे चढ-उतार असणारी आणि वळ्यांनी युक्त होती. त्यांनी बहुमूल्य रेशमी वस्त्रे आणि शेला परिधान केला होता. दीक्षेच्या नियमानुसार त्यांनी सर्व अलंकार काढून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या अंग-प्रत्यंगांची शोभा आपल्या स्वाभाविक रूपात स्पष्ट झळकत होती. त्यांनी शरीरावर काळविटाचे कातडे आणि हातामध्ये दर्भ धरले होते. त्यामुळे त्यांच्या शरीराची कांती अधिकच वृद्धिंगत झाली होती. त्यांनी आपली सर्व नित्यकर्मे यथासांग पूर्ण केली. राजा पृथूने सर्व सभेला जणू काही हर्ष-वर्षावाने ओलेचिंब करीत आपल्या शीतल आणि स्नेहपूर्ण नेत्रांनी चारी बाजूंना बघितले आणि नंतर आपले भाषण सुरू केले. त्यांचे भाषण अत्यंत सुंदर, आकर्षक शब्दांनी युक्त, स्पष्ट, मधुर, गंभीर आणि निःसंदिग्ध असे होते. जणू काही सर्वांना उपकृत करण्यासाठी ते आपले अनुभव कथन करीत होते. (११-२०)
पृथू म्हणाले - सज्जनहो, आपले कल्याण असो. आपण सर्व उपस्थित महानुभाव लोकहो, माझी प्रार्थना ऐका. जिज्ञासू पुरुषांनी संतसमाजामध्ये आपले मनोगत प्रगट करावे. या लोकी प्रजाजनांचे शासन, त्यांचे रक्षण, त्यांच्या उपजीविकेची सोय, तसेच त्यांना वेगवेगळेपणाने आपापल्या मर्यादेत ठेवण्यासाठी माझी राजा म्हणून नियुक्ती केलेली आहे. वेदज्ञ मुनींच्या मतानुसार, संपूर्ण कर्मांचे साक्षी श्रीहरी प्रसन्न झाल्यावर ज्या लोकाची प्राप्ती होते, तो मला मिळावा. या माझ्या मनोरथपूर्तीसाठी मी त्यांचे यथावत पालन करीन. जो राजा प्रजेला धर्ममार्गाचे शिक्षण न देता केवळ त्यांच्याकडून कर वसूल करण्यातच धन्यता मानतो, तो आपल्या प्रजेच्या पापाचाच भागीदार होतो आणि आपले ऐश्वर्य घालवून बसतो. म्हणून हे प्रिय प्रजाजनहो, आपल्या या राजाचे परलोकात हित करण्यासाठी आपण एकमेकांविषयींची दोष पाहाण्याची दृष्टी सोडून, हृदयात भगवंतांचे स्मरण करीत आपापल्या कर्तव्याचे पालन करीत राहा. कारण त्यातच तुमचा स्वार्थ आहे आणि याप्रकारे माझ्यावरही तुमचा अनुग्रह होईल. विशुद्धचित्त देव, पितर आणि महर्षिगण हो ! आपणही माझ्या या प्रार्थनेला दुजोरा द्या. कारण कोणतेही कर्म असो, मृत्यूनंतर त्याचा कर्ता, उपदेश करणारा आणि समर्थन करणारा, या सर्वांना त्याचे समान फळ मिळते. माननीय सज्जनहो, काही श्रेष्ठ महानुभावांच्या मतानुसार कर्माचे फळ देणारे भगवान यज्ञपतीच आहेत; कारण इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी कर्मफलस्वरूप काही काही भोगभूमी आणि शरीरे फार तेजस्वी दिसतात. मनू, उत्तानपाद, महीपती ध्रुव, राजर्षी प्रियव्रत, आमचे आजोबा अंग तसेच ब्रह्मदेव, शिव, प्रह्लाद, बली आणि या कोटीतील अन्यान्य महानुभावांच्या मते धर्म-अर्थ-काम-मोक्षरूप चतुर्वर्ग, स्वर्ग व मोक्ष यांची एकरूपता होण्यासाठी कर्मफलदाते म्हणून भगवान गदाधरांचीच आवश्यकता आहे. याविषयी केवळ मृत्यूचा नातू वेन इत्यादी काही शोचनीय अशा धर्मविन्मुख लोकांचीच मतभिन्नता आहे. म्हणून त्यांच्या मताचा विचार करणे योग्य नाही..

No comments:

Post a Comment