वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीये सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करू ॥३॥
येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥
तुकोबांच्या पत्नी सौ. जिजाबाई रोज घरचा कामधंदा आटोपून स्वयंपाक उरकून तुकोबांचे जेवण घेऊन भंडाऱ्यावर जात असत. तुकोबांना जेऊ घातल्यानंतर आपण जेवत असत, तुकोबा परमार्थ साधनेत निमग्न असता - विदेह स्थितीत असता त्यांची सर्व काळजी सौ. जिजाबाई घेत असत. तुकोबांच्या परमार्थात जिजाबाईंचा फार मोठा वाटा होता. शरीर कष्टवून परोपकार, संत वचनाचे पाठ- पाठांतर, वाचणे विठ्ठलाचे नामस्मरण आणि चित्ताने विठोबाचे ध्यान - अशी साधना अखंड चालू असता तुकोबांच्या स्वप्नात श्रीपंढरीराय नामदेवरायांना घेऊन आले. त्यांनी तुकोबांना जागे केले आणि जगत् उध्दाराकरितां कवित्व करण्याचे काम सांगितले.
५. कवित्वाची स्फूर्ती आणि जलदिव्य
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
सांगितले काम करावे कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ॥धृ॥
माप टाकी सळ धरिली विठ्ठले । थापटोनि केले सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटी लावी तुका ॥३॥
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसे टाकून । आतां उदासीन न धरावे ॥धृ॥
सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारे विश्रांती पावईन ॥२॥
नामदेवापायी तुक्या स्वप्नी भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥
तुकोबांचा स्वतःचा उध्दार झाला होता.आता त्यांना लोकोध्दार करावयाचा होता. त्यांना लाभलेला प्रसाद लोकांना वाटावयाचा होता. परमात्म्याचा संदेश, निरोप त्यांना घरोघर पोहोचावयाचा होता.
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥
तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली.
यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती । पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥
आणि तुकोबांचे मुखातून अभंगगंगा वाहू लागली. सभाग्यश्रोते श्रवण करू लागले.
बोलावे म्हणून बोलतो उपाय । प्रवाहेचि जाये गंगाजळ ॥१॥
भाग्य योगे कोणा घडेल श्रवण । कैचे तेथे जन अधिकारी ॥२॥
तुकोबांच्या अभंगातून श्रुतीशास्त्राचे मथित, महाकाव्य फलार्थ निघू लागला. आळंदीत श्रीज्ञानदेव महाराजांच्या महाद्वारात तुकोबा कीर्तन करीत असता, ही प्रासादिक अभंगवाणी महापंडित रामेश्वरभट्टजी यांच्या कानावर जाऊन आदळली. त्यांना धक्काच बसला. ही गीताची किं मूर्तीमंत, किं नेणो श्रीमत् भागवत ॥ - ही प्रत्यक्ष वेदवाणीच आणि ती प्राकृतातून आणि ती तुकोबाच्या मुखातून !
तुकयाचे कवित्व ऐकून कानी । अर्थ शोधूनि पाहाता मनी ।
म्हणे प्रत्यक्ष हे वेदवाणी । त्याचे मुखे कानी न ऐकावी ॥
तरी यासी निषेधावे । सर्वथा भय न धरावे ॥
रामेश्वरशास्त्रींनी निषेध केला ते म्हणाले - “तुम्ही शूद्र आहात? तुमच्या अभंगवाणीतून वेदार्थ प्रगट होत आहे, तुमचा तो अधिकार नाही. तुमच्या मुखाने तो ऐकणे हा अधर्म आहे. तुम्हाला हा उद्योग कोणी सांगितला.” तुकोबा म्हणाले, “ही माझी वाणी नव्हे, ही देववाणी आहे.”
करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥२॥
नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल ।