योजनाचा पाऊस आणि मतदार राजा
सध्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या पुढार्यांनी सामान्य माणसाला औटघटकेचा राजा बनवून टाकलंय. ही येऊ घातलेल्या निवडणुकांची किमया आहे. हा बदल फार खुशीने घडला असे नव्हे. त्यांचाही नाईलाज झालाय. सामान्य माणसाच्या मताशिवाय पुन्हा सत्ताप्राप्ती शक्य नाही हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळेच एका वर्षापुरती का होईना पण त्याची प्रतिष्ठापना करण्यात कोणतीही कसूर सोडलेली नाही.
राजकारण्यांच्या करणीने सामान्य
माणूस मात्र पुरता भांबावून गेलाय. रोजच्या रोज जाहीर होणार्या योजनांनी गोंधळून गेलाय. योजना जाहीर करण्यात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. योजनाचा पाऊस केला जात आहे.कालच राज्य सरकारने अत्याचारपीडितांसाठी ‘मनोधैर्य’ नावाची योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत बलात्कार आणि ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला, लैंगिक अत्याचार झालेल्या बालकांना अर्थसहाय्य केले जाईल. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातील. याआधीच्या काही घोषणा याच मार्गाने जाणार्या आहेत. राज्यातील मदरशांना दहा कोटींचे अनुदान जाहीर झाले. विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी व इंग्रजी विषयांसाठी तीन शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. यातील डी.एड. झालेल्या शिक्षकांना महिना सहा हजार तर बी.एड.झालेल्या शिक्षकांना महिना आठ हजार रुपये मानधन दिले जाईल.
दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी १ जानेवारीपासून सुकन्या योजना लागू होईल. शिक्षा सहयोग योजनेतून नववी ते बारावीत शिकणार्या मुलींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सामान्य माणसाने या योजनांचे स्वागत केल्याचे फारसे ऐकिवात नाही. जनता खूश झाली आहे असंही बघण्यात नाही. याचे कारण सर्वज्ञात आहे. आतापर्यंत ज्या काही योजना जाहीर झाल्या त्याचा फायदा अनेक गटांनी घेतला. मग ते सरकारी बाबू असतील, राजकीय पुढारी असतील किंवा तथाकथित समाजसेवी संस्था असतील. नेत्यांनी चार्यापासून कोळशापर्यंत बरंच काही गिळंकृत केलं. सामान्यांच्या नावाखाली भलत्यांचीच बेगमी केली गेली.
योजना भाराभर पण अंमलबजावणी मात्र शून्य झाली. या योजनांच्या बाबतीत तसं होणार नाही कशावरून, अशी शंका त्याच्या मनात आहे. निवडणुकीच्या निमित्ताने का होईना पण योजना राबवल्या जाव्यात. जनतेलाही खूश होण्याची संधी मिळावी. घराघरात विराजमान झालेल्या गणपतीबाप्पांचे अनेक चमत्कार जनता ऐकून आहे. त्यांनी हाही एक चमत्कार घडवावा. योजनांचा फायदा थेट जनतेच्या झोळीत टाकावा. तशी सुबुद्धी सरकारला, बाबूंना, राजकारण्यांना द्यावी. हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
No comments:
Post a Comment