Friday, 30 December 2016

माळेगाव यात्रा : लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा



माळेगाव यात्रा : लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा

येळकोट येळकोट  जय मल्हार !!
शिवा मल्हारी, येळकोट येळकोट घे..!!
खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशातील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्लारी, मल्लारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण बारा स्थाने आहेत. त्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे एक तीर्थक्षेत्र आहे. येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. याच आवारा यात्रा भरते.  मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत.(मंदिराचे बांधकाम चालु असल्याने सध्या हे खांब काढले आहेत) गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती.
खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी प्रशिद्ध आहे. या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळ्यांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेतच होते. खंडोबाचा उत्सव व यात्रा मार्गशीष महिण्यात सुरू होते. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु, कालाच्या ओघात सध्या ती पाच दिवस भरते. शनिवारी (ता. ३१ डिसेंबर) यात्रेचा शेवत आहे. यात्रेत देवस्वारीची गावातून पालखी निघते. या वेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे.
माळेगावच्या यात्रेत भरणार गुरांचा बाजार ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. या मेळ्यांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. यात्रेत जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रश्‍न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालत असे. व नंतर त्यांची सुनावणी होत असे. यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असे. माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.
------------
हौशे-गवसे-नवशांची यात्रा 
--लातूर, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील माळेगाव ही खंडोबा देवस्थान आहे. सुग्या - मुग्यांची, हौशे-गवसे-नवशांची यात्रा,  माळेगाव अशी विशेषणे असलेल्या या यात्रेत जे जेजुरीत मिळत नाही, ते येथे  मिळते. सर्व जातीधर्मांचे श्रद्धास्थान, तमाशेवाले, लोकनाट्यवाले, तळागाळातील व पिढ्यानपिढ्या भटके जीवन जगणाऱ्या जाती-जमातीचे आप्तस्वकीय एकत्र येण्याचे हेच ठिकाण आहे. वर्षभराच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक करार मदार खंडेरायाच्या दरबारात होतात.
यात्रेचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे घोडे, उंट, गाढव यांचा बाजार व प्रदर्शन आणि राष्ट्रीय पातळीवर चॅम्पियन ठरलेल्या आणि दुर्मिळ असलेल्या देवणी व लालकंधारी गायी व वळूंचे प्रदर्शन. अलीकडील काळात सुरू करण्यात आलेले बचतगट प्रदर्शन व कृषी प्रदर्शनही यात्रेकरूंचे विशेषतः शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. यात्रेतील कृषी विषयक स्टॉलद्वारे शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची अवजारे व अत्याधुनिक शेतीची माहिती करून देण्यास उपयोगी ठरत आहेत.
अखंडित यात्रा 
नांदेड-लातूर महामार्गावर सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेले माळेगाव बहामुनी राजवटीतच काही काळ निजामी राजवटीत होते. निजामाच्या काळातही ही यात्रा अखंडित सुरू होती. निजामाच्या काळात मंदिराची व्यवस्था राजे गोपालसिंह कंधारवाला यांच्याकडे होती. सध्या ही व्यवस्था ट्रस्ट व जिल्हा परिषदेकडे आहे. स्वयंभू वेदीवर दगडी चौरंगावर खंडोबा म्हाळसाचे मुखवटे आहेत. त्यांच्यासमोर तांदळा आहे. त्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, बिदरचा व्यापारी गाढवाच्या पाठीवर तांदळ्याच्या गोण्या घेऊन जात असताना. रात्र झाली म्हणून माळेगावला मुक्कामी थांबला. सकाळी उठून तो पुढील प्रवासाला जाण्याची तयारी करत होता. तांदळाच्या गोण्या उचलून तो गाढवांच्या पाठीवर ठेवत असताना यातील एक गोणी काही केल्या उचलत नव्हती. त्या वेळी त्याला रात्री झोपेत पडलेले स्वप्न आठवले. रिसनगाव येथील भक्ताच्या हस्ते माझी प्रतिष्ठा कर, असे काहीसे स्वप्न या व्यापाऱ्याला आठवले. रिसनगावच्या नागोजी नाईक यांनाही असेच स्वप्न पडले होते. त्यानंतर व्यापाऱ्याच्या विनंतीवरून नाईकांनी तांदळाची गोणी उघडून पाहिली असता त्यात तांदळा (शालिग्राम) सापडला. खंडोबाचे प्रतीक म्हणून व्यापाऱ्याने तांदळ्याची प्रतिष्ठापना केली. कालांतराने या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले.

मानकऱ्यांची परंपरा आजही कायम 
माळेगावपासून २० किलोमीटरवर रिसनगाव येथील नाईक कुटुंबाकडे माळेगावच्या पालखीचा मान आहे. कंधारजवळील भोसी येथील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे. चंपाषष्टीच्या दिवशी भोसीकर कुटुंब आपले पागोटे घेऊन माळेगावला येतात. ते पागोटे मार्गशीर्ष अमावस्येच्या यात्रेपर्यंत मंदिरात ठेवतात. आजही भोसीकर कुटुंबीय चंपाषष्टीपासून अमावस्येपर्यंत पागोटे वापरत नाहीत. पूर्वी महिनाभर भरणारी यात्रा आता पाच दिवस भरते.
‘माळेगावच्या माळावरी, चारी बुरुजा बराबरीतिथे नांदतो मल्हारी, देव गं मल्लवा!!’

                                                                                                    भागवत पेटकर


No comments:

Post a Comment