Saturday, 31 December 2016

संत नामदेव : वारकरी सांप्रदायातील क्रांतिकारक भक्त

संत नामदेव : वारकरी सांप्रदायातील क्रांतिकारक भक्त
देवांनी सुद्धा भारतभूमीवरच जन्म घेतला. ही देवभूमीच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. संत हे चालते फिरते देवच मानले जातात. आपल्या देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. गुरूचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि समर्थ रामदास हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होते. त्यांच्यामुळे आध्यात्मिक समता घडली. माणूस उभा राहिला तरच देश उभारेल, हे जाणून संतांनी जागृतीचे काम केले. तर जाणून घेऊया अशाच काही संतांबद्दल.
नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडूरंग। जनी म्हणे नामदेवा बोला !!
संत नामदेव महाराज संत परंपरेतील मोठे भक्त. याचा जन्म २६ ऑक्टोबर १२७०चा. संत नामदेवांनी मोठी भक्ती चळवळ घडवली. नामदेव महाराज एका शिंपी परिवारात जन्मले. त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावात. वडील दामाशेटी तर आई गोणाई. आऊबाई बहीण. त्यांच्या पत्नीचे नाव राजाई. नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल ही चार मुलं. लिंबाई मुलगी. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सुना. असा छान बहरलेला संसार त्यांनी केला. त्यांच्या देवपिसे होऊन केलेल्या भक्तीला सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर त्यांनी सगळ्यांना आपलं बनवलं. या सगळ्या परिवारानेच नामदेवांच्या प्रभावात अभंगरचना केली आहे.
नामदेव ज्ञानदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला आला. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. त्यातून कीर्तनाच्या रंगी नाचत देशभर ज्ञानदीप लावण्यासाठी दोघांच्याही प्रभावातली सगळी संतमंडळी एकत्र झाली. त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरू झाली. महाराष्ट्र पिंजून गुजरात, राजस्थान आणि पंजाबापर्यंत हे संत गेले. माणसाला माणूस बनवण्याची ही धडपड होती. चोखामेळ्यासारखे अस्पृश्यही टाळकरी बनून त्यांना साथ देत. जनाबाईंसारखी जातीने अतिशूद्र असणारी स्त्री कीर्तनाचं संचलन करत असे. ज्ञानदेव अभंग सूचवत. अशा जातीपातीच्या भिंती तुटत होत्या. गोरा कुंभार, सावता माळी, परिसा भागवत, चोखा महार आणि त्यांचा परिवार, जगन्मित्र नागा, नरहरी सोनार, दासी जनी सगळेच त्यात होते. हे संत म्हणजे टाळकुटे विरक्त नव्हते तर त्या त्या समाजांचे धार्मिक, वैचारिक आणि सामाजिक नेतेच होते.
या ऐतिहासिक तीर्थयात्रेचं उद्यापन पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटावर झालं. स्पृश्य अस्पृश्य, उच नीच असे सगळे भेदाभेद सहभोजनात गळून पडले. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या नीच जातिभेदांना दिलेला हा मोठा धक्का होता. पुढे नामदेवांनी पंढरपुरातल्या विठ्ठलमंदिराच्या दारात उभी केलेली चोखोबांसारख्या अस्पृश्याची समाधी त्यांच्या खंबीर क्रांतिकारत्वाचा पुरावाच आहे. यानंतर लवकरच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्याचा अत्यंत हृदयद्रावक आंखो देखा हाल नामेदवांनी लिहून ठेवलाय. पुंडलिकापासून जनाबाईंपर्यंतच्या भक्तांचं चरित्र लिहून नामदेवांनी या क्रांतिकारक चळवळीचं मोठंच डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. ते महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचे चरित्रकार मानायला हवेत आणि ते आद्य आत्मचरित्रकारही आहेत.
पंजाबात संत नामदेव दोन दशकांहून अधिक काळ राहिले. तिथे त्यांनी केलेल्या मशागतीतून शीख धर्माचा वटवृक्ष उभा राहिलाय. नारायण आणि नामदेव एकच आहे, असं मानणाऱ्या शीख परंपरेच्या गुरू ग्रंथसाहेबातही नामदेवांची ६१ पद आहेत. नामदेवांचा देशभरावरचा प्रभाव आजही पाहता येतो. महाराष्ट्र आणि पंजाबाबरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत त्यांची मंदिरं आहेत. तामिळनाडूपासून जम्मूपर्यंतचे भक्त त्यांचं नाव अभिमानाने मिरवतात. ३ जुलै १३५० रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला. त्यांची एक समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे. तर दुसरी पंजाबमधील घुमान येथे आहे. 

Friday, 30 December 2016

माळेगाव यात्रा : लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा



माळेगाव यात्रा : लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा

येळकोट येळकोट  जय मल्हार !!
शिवा मल्हारी, येळकोट येळकोट घे..!!
खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशातील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्लारी, मल्लारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण बारा स्थाने आहेत. त्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे एक तीर्थक्षेत्र आहे. येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. याच आवारा यात्रा भरते.  मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत.(मंदिराचे बांधकाम चालु असल्याने सध्या हे खांब काढले आहेत) गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती.
खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी प्रशिद्ध आहे. या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळ्यांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेतच होते. खंडोबाचा उत्सव व यात्रा मार्गशीष महिण्यात सुरू होते. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु, कालाच्या ओघात सध्या ती पाच दिवस भरते. शनिवारी (ता. ३१ डिसेंबर) यात्रेचा शेवत आहे. यात्रेत देवस्वारीची गावातून पालखी निघते. या वेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे.
माळेगावच्या यात्रेत भरणार गुरांचा बाजार ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. या मेळ्यांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. यात्रेत जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रश्‍न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालत असे. व नंतर त्यांची सुनावणी होत असे. यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असे. माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.
------------
हौशे-गवसे-नवशांची यात्रा 
--लातूर, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील माळेगाव ही खंडोबा देवस्थान आहे. सुग्या - मुग्यांची, हौशे-गवसे-नवशांची यात्रा,  माळेगाव अशी विशेषणे असलेल्या या यात्रेत जे जेजुरीत मिळत नाही, ते येथे  मिळते. सर्व जातीधर्मांचे श्रद्धास्थान, तमाशेवाले, लोकनाट्यवाले, तळागाळातील व पिढ्यानपिढ्या भटके जीवन जगणाऱ्या जाती-जमातीचे आप्तस्वकीय एकत्र येण्याचे हेच ठिकाण आहे. वर्षभराच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक करार मदार खंडेरायाच्या दरबारात होतात.
यात्रेचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे घोडे, उंट, गाढव यांचा बाजार व प्रदर्शन आणि राष्ट्रीय पातळीवर चॅम्पियन ठरलेल्या आणि दुर्मिळ असलेल्या देवणी व लालकंधारी गायी व वळूंचे प्रदर्शन. अलीकडील काळात सुरू करण्यात आलेले बचतगट प्रदर्शन व कृषी प्रदर्शनही यात्रेकरूंचे विशेषतः शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. यात्रेतील कृषी विषयक स्टॉलद्वारे शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची अवजारे व अत्याधुनिक शेतीची माहिती करून देण्यास उपयोगी ठरत आहेत.
अखंडित यात्रा 
नांदेड-लातूर महामार्गावर सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेले माळेगाव बहामुनी राजवटीतच काही काळ निजामी राजवटीत होते. निजामाच्या काळातही ही यात्रा अखंडित सुरू होती. निजामाच्या काळात मंदिराची व्यवस्था राजे गोपालसिंह कंधारवाला यांच्याकडे होती. सध्या ही व्यवस्था ट्रस्ट व जिल्हा परिषदेकडे आहे. स्वयंभू वेदीवर दगडी चौरंगावर खंडोबा म्हाळसाचे मुखवटे आहेत. त्यांच्यासमोर तांदळा आहे. त्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, बिदरचा व्यापारी गाढवाच्या पाठीवर तांदळ्याच्या गोण्या घेऊन जात असताना. रात्र झाली म्हणून माळेगावला मुक्कामी थांबला. सकाळी उठून तो पुढील प्रवासाला जाण्याची तयारी करत होता. तांदळाच्या गोण्या उचलून तो गाढवांच्या पाठीवर ठेवत असताना यातील एक गोणी काही केल्या उचलत नव्हती. त्या वेळी त्याला रात्री झोपेत पडलेले स्वप्न आठवले. रिसनगाव येथील भक्ताच्या हस्ते माझी प्रतिष्ठा कर, असे काहीसे स्वप्न या व्यापाऱ्याला आठवले. रिसनगावच्या नागोजी नाईक यांनाही असेच स्वप्न पडले होते. त्यानंतर व्यापाऱ्याच्या विनंतीवरून नाईकांनी तांदळाची गोणी उघडून पाहिली असता त्यात तांदळा (शालिग्राम) सापडला. खंडोबाचे प्रतीक म्हणून व्यापाऱ्याने तांदळ्याची प्रतिष्ठापना केली. कालांतराने या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले.

मानकऱ्यांची परंपरा आजही कायम 
माळेगावपासून २० किलोमीटरवर रिसनगाव येथील नाईक कुटुंबाकडे माळेगावच्या पालखीचा मान आहे. कंधारजवळील भोसी येथील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे. चंपाषष्टीच्या दिवशी भोसीकर कुटुंब आपले पागोटे घेऊन माळेगावला येतात. ते पागोटे मार्गशीर्ष अमावस्येच्या यात्रेपर्यंत मंदिरात ठेवतात. आजही भोसीकर कुटुंबीय चंपाषष्टीपासून अमावस्येपर्यंत पागोटे वापरत नाहीत. पूर्वी महिनाभर भरणारी यात्रा आता पाच दिवस भरते.
‘माळेगावच्या माळावरी, चारी बुरुजा बराबरीतिथे नांदतो मल्हारी, देव गं मल्लवा!!’

                                                                                                    भागवत पेटकर


Thursday, 29 December 2016

#माळेगाव यात्रा : #लोकसंस्कृतीचा ठेवा..||

माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणार्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे. माळेगाव येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत. गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती.
खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी . या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळय़ांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते.  खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली तेव्हा इ.स. १८०९ मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे.

माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु सध्या ती पाच दिवस भरते.

भटक्या जमातींच्या जीवनप्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रष्न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते. या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असते.

माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.

Friday, 9 December 2016

भगवद्‌गीता : जीवन जगण्याचा मार्ग

भगवद्‌गीता : जीवन जगण्याचा मार्ग

भगवद्‌गीता  हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, यांचे मार्गदर्शन करतो. भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश म्हणजे  'भगवद्‌गीता' होय. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. भगवद्‌गीता  ग्रंथ पवित्र असल्याने  न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेतली जाते. गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे. भगवदगीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली. . हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात.
कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल, असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामध्ये गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवून दिले.  भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की, गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते. तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो. त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे. महाभारतातल्या 'भीष्म पर्वा'मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामध्ये ती 'गायली' जाते. उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही. परंतु, तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता 'महर्षी व्यास' यांनी लिहिली असे मानले जाते.


गीतेतील अध्याय

अध्याय १ - अर्जुनविषादयोग
अध्याय २ - सांख्ययोग
अध्याय ३ - कर्मयोग
अध्याय ४ - ज्ञानसंन्यासयोग
अध्याय ५ - कर्मसंन्यासयोग
अध्याय ६ - आत्मसंयमयोग
अध्याय ७ - ज्ञानविज्ञानयोग
अध्याय ८ - अक्षरब्रह्मयोग
अध्याय ९ - राजविद्याराजगुह्ययोग
अध्याय १० - विभूतियोग
अध्याय ११ - विश्वरूपदर्शनयोग
अध्याय १२ - भक्तियोग
अध्याय १३ - क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
अध्याय १४ - गुणत्रयविभागयोग
अध्याय १५ - पुरुषोत्तमयोग
अध्याय १६ - दैवासुरसंपविभागयोग
अध्याय १७ - श्रद्धात्रयविभागयोग
अध्याय १८ - मोक्षसंन्यासयोग