Sunday, 30 August 2015

‘तुका म्हणे ऐशा नरा..’ ..........

‘तुका म्हणे ऐशा नरा..’ ...........
भाजपावाल्यांचा देशातल्या प्रत्येक म्युनिसिपाल्टीने जाहीर सत्कार केला पाहिजे. त्यांना शाल, श्रीफळ अर्पण केले पाहिजे. हवे तर मानपत्रही दिले पाहिजे. खोटे बोलण्यात ही मंडळी जगात सगळय़ात निष्णात मंडळी आहेत, ते भाजपाच्या प्रत्येक नेत्याने आता जाहीरपणे सांगून टाकलेले आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी असे जाहीर केले आहे की, ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवली नव्हती..’ एवढे सांगून तोमर महाराज थांबलेले नाहीत तर त्यांनी पुढे अशीही आपली बुद्धी पाजरली आहे की, ‘परदेशातला काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये चढवू,’ असे प्रचारात मोदी म्हणालेच नाहीत. गुजरातमधून हद्दपार करण्यात आलेले भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी १४ जुलै २०१५ रोजी भोपाळ येथील एका सभेत असे जाहीर केले होते की, ‘अच्छे दिन येण्याचे आश्वासन आम्ही दिले असले तरी पाच वर्षात अच्छे दिन येणार नाहीत. त्यासाठी २५ वर्षे लागणार आहेत.’ निवडणूक प्रचारकाळात मोदींनी देशभर ३४८ सभा घेतल्या. त्या प्रत्येक सभेत मोदी महाराज यांनी दोन घोषणा केल्या, ‘अब की बार भाजपा सरकार’, ‘अच्छे दिन की शुरुवात’ त्यानंतर भाजपाने घोषणा दिली की, ‘महंगाई की पडी मार, अब की बार मोदी सरकार..’ १ जानेवारी २०१४ रोजी बनारस येथे भाषण करताना मोदींनी ‘अच्छे दिन’चा पहिल्यांदा उल्लेख केला. त्यानंतर घरा-घरात ‘अच्छे दिन’चा पुकारा सुरू झाला आणि लोकांच्या अपेक्षा आकाशाला भिडल्या. एवढय़ा मोठय़ा देशाचे सरकार चालवताना अनुभव नसलेल्या मोदींची जेव्हा दमछाक होऊ लागली, त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, देश चालवणे सोपे काम नाही. ३२३चे पूर्ण बहुमत मिळाले असताना संरक्षण आणि रेल्वे या दोन महत्त्वाच्या खात्यांसाठी मोदींना लोकसभेचे सदस्य नसलेल्या दोघांना आयात करावे लागले. मनोहर पर्रिकर आणि सुरेश प्रभू यांना राज्यसभेवर घेऊन या दोन मोठय़ा खात्यांची जबाबदारी द्यावी लागली. आजही मोदींच्या मंत्रिमंडळात स्वत:चे खाते समर्थपणे पेलणारे कोणीही नाही. शिवाय मोदींच्या डाव्या-उजव्या हाताला अंबानी आणि अदानी उभे आहे. या दोन भांडवलदारांनी निवडणुकीच्या प्रचारखर्चाची सगळी जबाबदारी स्वीकारून मोदींसाठी वातावरण तयार करण्यात पुढाकार घेतला. त्याबदल्यातच मोदींनी भूमिअधिग्रहण विधेयक आणण्याचा कट रचला. त्या कटाचे सूत्रधार मोदी आणि आदनीच होते. मोदींचा तो कट लोकसभेत विरोधी बाकावर बसलेल्या अवघ्या ४५ संख्येतल्या काँग्रेसने हाणून पाडला. राज्यसभेत विधेयक पराभूत होणार, असे दिसू लागल्यावर मग मोदींचे पाय लटपटू लागले. दुसरीकडे महागाईवर नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले नाही. जो व्यापारी वर्ग एक वर्षापूर्वी शंभर टक्के मोदींसोबत होता, त्या व्यापारी वर्गाचाही मोठय़ा प्रमाणात भ्रमनिरास झाला. त्यामुळे १५ महिन्यांत मोदींच्या लखलखत्या भांडय़ाची कलई निघू लागली. जे लोक ‘मोदी-मोदी’ करत होते, जे लोक वाहिन्यांवर मोदी दिसले की, त्यांची भाषणे ऐकण्यात तल्लीन होत होते, त्याच लोकांनी महागाईने हैराण झाल्यामुळे मोदींचे नाव टाकले आणि टीव्हीवर मोदी दिसले की, टीव्ही बंद करू लागले. ज्यांनी मोदींना डोक्यावर घेतले होते, त्यांचा १५ महिन्यांत भ्रमनिरास झाला आणि देशातल्या पोटनिवडणुकांमधून हा भ्रमनिरास व्यक्तही होऊ लागला.
आता जेव्हा जनमत भाजपा आणि मोदींच्या विरुद्ध वेगाने जात आहे, असे लक्षात आल्यावर ‘अच्छे दिन’ची स्वप्ने आम्ही दाखवली नव्हती, असे सांगू लागले आहेत; पण या विषयातली गंमत अशी आहे की, ज्या जादूगाराने आपल्या पोतडीतून ही स्वप्ने काढली होती, तो जादूगार काही बोलत नाही. त्याच्या मंत्रिमंडळातील परराष्ट्रमंत्र्यांवर गंभीर आरोप झाले, हा बापू काही बोलत नाही. भाजपाचे दोन मुख्यमंत्री धडधडीतपणे भ्रष्टाचारात सामील झाल्याचे स्पष्ट आरोप होत आहे, हा बापू काही बोलत नाही. ज्या माणसाला भारत सरकारने या देशातून हद्दपार केले आहे, त्या माणसाबरोबर भागीदारी करून सरकारच्या ताब्यातला धोलपूरचा राजमहाल बळकावून तेथे हॉटेल काढणा-या मुख्यमंत्री वसुंधराराजेंच्या विरोधात सज्जड पुराव्यानिशी लोकसभेत आरोप झाल्यानंतर हा बापू गप्प. बाजू उलटत चालली की, गप्प बसायचे. त्याप्रमाणे अनुकूल परिस्थितीत हातवारे करून लाल किल्ल्यावरूनही बोलायला कमी न करणारा हा माणूस आता ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून गप्प आहे.
भाजपाच्या या माणसांच्या लबाडीची एकदा ‘डीएनए’ टेस्ट केली पाहिजे. धडधडीतपणे किती खोटे बोलता येते, याचा हा नमुना आहे. मार्च, एप्रिल, मे २०१४ या वर्षातील तीन महिन्यांची वृत्तपत्रे आणि त्या वृत्तपत्रांचे कोणतेही पान उघडून बघितले तर फक्त ‘मोदी-मोदी-मोदी’, ‘नमो नमो’, ‘अच्छे दिन’, ‘महंगाई की पडी मार..’ याच शब्दांनी भरलेली आहेत आणि आता राज्यकर्ते म्हणून यापैकी कोणत्याही गोष्टीची पूर्तता करण्याची जबाबदारी घ्यायला यांची तयारी नाही. अशा या अस्सल खोटारडय़ा भाजपाच्या नेत्यांचा सत्कार करावा की, करू नये, यावर मतभेद होऊ शकतील; परंतु तुकोबाच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘तुका म्हणे ऐशा नरा..’ या तुकोबांच्या अभंगावर मतभेद होणार नाहीत.

No comments:

Post a Comment