Sunday, 14 June 2020

भक्ती प्रेमाचा मेळा ‘पंढरीची वारी’
अवघें जेणें पाप नासे ! तें हें असे पंढरीसी !!
गात जागा गात जागा ! प्रेम मागा विठ्ठला!!
अवघी सुखाची च राशी ! पुंडलिकाशीं वोळली हे !!
तुका म्हणे जवळी आलें ! उभे ठालें समचरणीं!!
हजारो वारकरी माऊली, दुकोबांच्या सोहळ्यात पंढरीची वाट चालत आहेत. आषाढ म्हटले की, अवघ्या वारकरी संप्रदाय आणि मराठी जणांना आषाढ वारीचे वेध लागतात. देहू आणि आळंदीहून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघताच त्यांच्याबरोबर वारकरी आणि भक्तांचा अथांग सागर टाळ-चिपळ्याच्या निनादात, विठूनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट धरतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक या वारीत सामील होत असतात. उण, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक चढ-उतार पार करत वारकरी पंढरीची वाट चालत असतो. परंतु, चालताना चालेला विठूनामाचा जयघोष त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती करून देत असतो. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांना अशा संकटांची तमा नसते. अशी तळमळ, ओढ, प्रेम, निष्ठा दुसरीकडे क्वचितच पाहण्यास मिळत असावी.
कोणतेही निमंत्रण नाही आग्रह नाही सर्व लोक स्वइच्छेने स्वखुशीने आणि स्वखर्चाने या वारीत सामील होत असतात. एका ध्येयाने इतका मोठा लोकसमूह एकत्र येऊन इच्छित स्थळी सुव्यवस्थितपणे एकमेकांना सहकार्य करत शिस्तीत पोचतो. अाबालवृद्ध, शिक्षित, अडाणी, गरीब, श्रीमंत सर्वच यात सामील होतात.
आषाढी म्हटले, की डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी ! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची वारी. लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात, विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना ‘माऊली-माऊली’ची हाक देतात. हा अनोखा माऊलीच्या अफाट प्रेमाचा मेळावा बघणाऱ्याचे खरेच डोळ्यांचे पारणे फिटतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आषाढीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आळंदी, देहू वरून पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. महाराष्ट्रात बहुसंख्य शेतकरी वर्ग हा खेड्यांपाड्यांतून राहतो आणि त्या वर्गात आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो.
त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या म्हणजेच पंढपूरच्या प्रेमनगरी वारकरी चंद्रभागेच्या प्रेमात न्हाऊन त्याच्या आणि एकमेव फक्त त्याच्याच असणाऱ्या त्याच्या लाडक्या, प्राणप्रिय सावळ्या विठूमाऊलीच्या प्रेमात आकंठ डुंबून आणि ‘त्या’ सावळ्या परब्रह्माच्या चरणी स्वत:ला झोकून देऊन अमाप प्रेमाची लयलूट तर करतोच पण साठवणही करतो आणि पुढे वर्षभर व्यवहारात वापरतो. हा असतो अक्षय असा त्याच्या परम निधानाचा प्रेमाचा साठा - जो कधीच संपूच शकत नाही.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे !
क्रोध अभिमान गेला पावतणी, एक एका लागतील पायी रे !!