Tuesday, 1 December 2015

प्रेमाचे ऋण............


Thanks giving हा अमेरिकेतला एक महत्त्वाचा दिवस. या निमित्तानं प्रत्येक जण उपकाराची जाणीव, काय मिळालं आहे त्याचे स्मरण ठेवतो. वेळ, व्यक्ती वा घटना ज्या कशाचे ऋणी आहोत अशा सर्व गोष्टींचे स्मरण करणे.
जगभर वर्षानुवर्ष अशा स्मरणांच्या नोंदी पाहिल्या तर माझ्यावर प्रेम करणारी माणसं मिळाली याबद्दल सर्व जण कृतज्ञ आहेत हे लक्षात येतं. हे प्रेम आई-वडिलांनी दिलेलं असेल, कुणा नातेवाइकाने, चाहत्याने, मित्रमैत्रिणीने, जोडीदाराने वा घरातल्या पाळलेल्या कुत्र्या-मांजराने! मिळालेलं प्रेम ही जमेची बाजू असते यात शंका नाही.
सुदैवाने माझ्या आयुष्यातही हीच जमेची बाजू आहे. सहवासात येणा-या व्यक्तीच्या स्वभावात, वागण्यात चांगले काय ते ध्यानात ठेवणे, त्याचा उल्लेख करणे, जे पटत नाही त्यावरून वाद टाळणे अशा साध्या गोष्टींमुळे मला माणसे जोडली गेली. हट्टीपणा हा माझ्या स्वभावातला दोष. तो कमी करायचा प्रयत्न केला तरी त्याचा फटका माझ्या जवळच्या माणसांना बसतो हे मला माहिती आहे. हा हट्टीपणा संवाद सुरू ठेवला तर अधिक सुसह्य होतो हे सुद्धा खरे आहे. हा संवाद करताना प्रामाणिक राहणं महत्त्वाचं आहे.
प्रेम टिकवायचा एक साधा मंत्र मला उमगला आहे. आपली जवळची माणसं टिकवण्याकरिता चेह-यावर मुखवटा न घेता त्यांना सामोरं जाणं प्रत्येकाला जमायला हवं. त्याला प्रामाणिक असण्याचा रोल असं कुणी कुत्सितपणे म्हणाले तरी चालेल. विश्वास असतो; पण तो कायम राहील हे नात्यातल्या दोघांचं कर्तव्य असतं. स्वीकार आणि थोडी तडजोड याची योग्य सांगड घातली की आपण नाती जपली आहेत हे उमगतं. नाती तोडणं, संसार मोडणं हे पर्याय शेवटचे आहेत. ते शेवटचे म्हणूनच वापरावेत.
प्रेम मिळणार नाही याची खात्री असेल तरच आपण ते पर्याय स्वीकारतो. पण त्याआधी व्यक्ती केंद्रित वा अतिव्यवहारी जीवन जगताना प्रेमाचा बळी दिला जातो आहे का ते तपासावे. माणसाचे विचार काळे-पांढरे असेच असतात. पण आयुष्य त्यामध्ये जगायला लावते. त्याचे भान असायला हवे. सतत टोकाची भूमिकाच बरोबर असते असे नाही. कोणतेही टोक म्हणूनच घातक आहे.
मनापासून प्रेम करावे, पार जग विसरून प्रेम करावे! पण प्रेमात असे टोक गाठायचे असेल तरी अतिभावनिक असणे जसे वाईट तसे निर्दयी असणे सुद्धा वाईट हा विचार मनात असणे आवश्यक आहे. आपल्याबरोबर आपल्या प्रिय व्यक्तीचे मन जपणे ही मध्यवर्ती भूमिका घेणे आवश्यक आहे.
प्रेमाची परिभाषा अच्छा लगता है!
प्रेमाचं स्वरूप आणि त्याकडून असलेल्या अपेक्षा कमी- अधिक होतात. प्रेमाकरिता काहीही करण्यापासून तर प्रेम म्हणजे विशेष काही नाही असाही विचार दिसतो. जोडीदार हवा आहे; पण तो कसा असावा? किती वेळा प्रेमात पडावं? किती व्यक्तींवर प्रेम करावं? असे अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरंही वेगवेगळी आहेत.
जन्मभर एका व्यक्तीबरोबर राहणं काहींना पसंत नाही तर काहींना एक सोडून दुस-याचा विचारही करायचा नाही. जोडीदाराशी एकनिष्ठ असणं गरजेचं नाही असाही एक गट आहे. प्रेमात असणारी अनिश्चितता मात्र कैक पटीनी वाढते आहे हे चित्र मोठया प्रमाणात आहे.
सुदैवानं अजून प्रेम नको असं मात्र झालेलं नाही. दोन पिढया प्रेम मिळाले की आयुष्यातले स्थैर्य, सुरक्षितता प्राप्त झाली असं मानत होते. त्यात तथ्य होतं. पण आता प्रेम ही भावना आणि त्याभोवतीचा कालावधी याचं नातं खूपच वेगळं आहे. आपली जीवलग व्यक्ती कोण यातच अनिश्चितता असल्याने प्रेम ही भावनाच आता अगदी कमी काळ असते ही वस्तुस्थिती आहे.
आज एक प्रेम संपलं की दुस-याचा शोध, त्यातून येणारे तणाव, अनेक बदल याचा ससेमिरा मागे लागतो, असं चित्र दिसतं. इतकंच काय आमचं प्रेम असंच असेल असंही मानणारी तरुण पिढी वाढते आहे. त्यांचा प्रेमाचा शोध अखंड चालतो हेच खरं!
प्रेम आणि नाते जोडण्याकरिता, टिकवण्याकरिता काय कराल?
जोडीदाराविषयी शारीरिक आर्कषणाबरोबर त्याची आणि तुमची प्रमुख तत्त्वे समान आहेत हे महत्त्वाचे आहे, असे सर्व ज्येष्ठांचे मत आहे.
तडजोड करण्याची तयारी ठेवा, असा त्यांचा आणखी एक सल्ला आहे.
हिंसाचार आणि वाईट सवयी याकडे दुर्लक्ष करू नका, त्याकरिता योग्य मदत घ्या.
एकमेकांचे मन जपा. काही गोष्टी स्वत:च्या मनाला मुरड घालूनही करा.
तुमचा जोडीदार तणावाखाली असेल तेव्हा त्याला साथ द्या, त्याच्या विरुद्ध जाऊ नका.
यापैकी किमान दोन गोष्टी आपण केल्या तर नाते टिकेल आणि आयुष्य सुकर होईल असे वाटते. प्रेम करा, पण मनापासून आणि शेवटपर्यंत, हेच जगातील अनुभवी प्रेमी सांगतात.
धीर धरा, विचार करा आणि मग कृती करा
आज स्पर्धा, माध्यमांचा विस्फोट आणि व्यक्त होण्याची तीव्रता या सर्व गोष्टी अतिशय वेगाने होत आहेत. त्या वेगाचा परिणाम नात्यावर, प्रेमावर झाला आहेच. प्रेम म्हणजे २ मिनिटं रेसिपी नाही. फक्त तरुण वयात मजा करायचा एक भाग म्हणजे प्रेम करणं नाही.
प्रेमात चंचलता, आवेग असतो, पण म्हणून प्रेम तेवढंच नसतं. झटपट प्रेम होईलही; पण नातं जोडणं, ते टिकवणं म्हणजे खरं प्रेम. ते प्रेम सोपं नाही. ते प्रेम मिळवणं हे आयुष्यातले सर्वात मोठे ध्येय असू शकते. त्याकरिता धीर धरा, विचार करा, अतिरेक करू नका. शांतचित्ताने निर्णय घ्या.
योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि तुमचे प्रयत्न हे सर्वच जमून येते असे नाही. पण स्वत:वर आणि प्रेमावर विश्वास ठेवा. प्रामाणिक राहा. संवाद साधा. आपली प्रिय व्यक्ती दुखावणार नाही हे भान नात्यातल्या दोघांनाही असावं. नात्याचं वा प्रेमाचं ओझं वाटणार नाही असं वागलो तर प्रेम ही हवीहवीशी भावना आहे यात शंका नाही. माणुसकीचे भान असू द्या. प्रेम करणं अवघड नाही हे लक्षात येईल!
http://prahaar.in/collag/370371